Breaking News

भाजपची एकात्म मानववादातून  ‘सबका साथ, सबका विकास’ ही घोषणा : आमदार प्रशांत ठाकूर

केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उद्या पनवेलमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त
एकात्म मानववाद भारतात रुजवणारा नेता म्हणून पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जनमानसात ओळख आहे. अखंड समाजाचा विचार करणार्‍या पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या चिंतनावर विचार करण्याची देशाला गरज आहे, असे प्रतिपादन उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आणि आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले. सेवा व समर्पण अभियान अंतर्गत पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंतीनिमित्त रायगड जिल्हा भाजपच्या वतीने शनिवार दिनांक 25 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजता पनवेलमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, असेही आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले.
खांदा कॉलनीमधील चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालयाच्या प्रांगणात सेवा व समर्पण अभियानाअंतर्गत पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला केंद्रीय पर्यावरण व वने मंत्री भुपेंद्र यादव, तसेच महाराष्ट्र राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रदेश संघटन मंत्री श्रीकांत भारतीय, प्रदेश सरचिटणीस तथा रायगडचे माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण, सेवा समर्पण अभियानचे प्रदेश प्रमुख राज पुरोहित, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार रविशेठ पाटील, आमदार महेश बालदी, महापौर डॉ. कविता चौतमोल, युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, भाजपचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष महेश मोहिते यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते शासकीय योजनेतील लाभार्थींचा सन्मान, दिव्यांगांना मदत, कोरोनामुळे अनाथ झालेल्या विद्यार्थ्यांना मदत, तसेच कुष्ठरुग्णांना धान्यवाटप केले जाणार आहे. सध्या देशात सुरू असलेल्या मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया, ग्रामीण कौशल्य योजना, मुद्रा बँक योजना आदी कल्याणकारी योजनांमागे मोदी सरकारचा नेमका सिद्धांत अंत्योदय, असाच आहे. त्यांचा आदर्श घेऊन भाजपच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘सेवा व समर्पण अभियान’ अंतर्गत दिव्यांगांना कृत्रिम अवयव, उपकरणे वाटप, आरोग्य तपासणी शिबिर, गरीबवस्ती, अनाथाश्रम, वृद्धाश्रम व रुग्णालयांना भेट देऊन फळेवाटप, प्लॅस्टिक निर्मूलन मोहीम, रक्तदान शिबिर, धान्यवाटप, कापडी पिशव्यांचे वाटप, नदी सफाई अभियान, अशाचप्रकारे विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जाणार आहेत, त्या अनुषंगाने पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला भाजप व सर्व आघाड्यांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, शक्तीकेंद्र, बूथ अध्यक्ष, तसेच कार्यकर्त्यांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले आहे.
संपूर्ण जग हे भांडवलशाही आणि साम्यवादावर वादविवाद करत होते. पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी तेव्हा याचा सूवर्णमध्य साधत एकात्म मानववाद मांडला. धर्म, अर्थ, काम मोक्षाकडे नेण्यासाठी असतात हा विचारही एकात्मवादात मांडला आहे. ‘एकात्म मानववाद’ ही विचारधारा रुजवण्यावर भर दिला. मोदी सरकारच्या योजना सारकारण्यामागेही एकात्म मानवतावाद आहे. पंडित दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना, स्टार्टअप इंडिया, मुद्रा बँक योजना, दीनदयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजना, मुद्रा बँक योजना, मेक इन इंडिया आदी योजनांमध्येही एकात्मवादाचा विचार केला आहे. भारतीय जनता पक्षाच्या सबका साथ सबका विकास ही घोषणाही एकात्मवादाच्या विचारातून आली. 60 वर्षांपूर्वी मांडलेली एकात्म मानवतावादाची संकल्पना आजही तंतोतंत लागू पडते, असेही भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply