पनवेल ः वार्ताहर
लेह, लडाख, उधमपूर, मणिपूर, अरुणाचल प्रदेश, मेघालय, आसाम येथे सीमेवरील सैनिकांना दिवाळी फराळ पाठविण्याचा उपक्रम भारत विकास परिषद संस्थेच्या पनवेल शाखेच्या वतीने या वर्षी प्रथमच राबविण्यात आला. एकूण 14 हजार पौष्टिक लाडू वेगवेगळ्या सीमेवर पाठविण्यात आले. भारतीय सैनिकांना दिवाळी फराळ पाठवावा ही प्रेरणा मुळात गेली काही वर्षे सैनिकांना नेमाने दिवाळी फराळ पाठवत असणार्या दहिसरच्या हिंदू नववर्ष स्वागत समितीकडून मिळाली. खरंतर सीमेवर फराळ पाठवणे सोपे नसते. फराळातील प्रत्येक पदार्थाची गुणवत्ता, टिकावूपणा, पदार्थ बनवताना वापरलेले साहित्य, पाठविण्यासाठी लष्कराचे नियम तसेच संबंधित अधिकार्यांची परवानगी या सर्व बाबींचा तपशील तसेच मार्गदर्शन हिंदू नववर्ष स्वागत समितीकडून मिळाले. लष्कराच्या गुणवत्ता यादीत परिपूर्ण उतरणारा, जवानांना पाठवण्यायोग्य पौष्टिक लाडू डोंबिवली येथील लाडूसम्राट कानिटकरांनी ’ना नफा, ना तोटा’ तत्त्वावर बनवून देण्याचे कबूल केले. अशा रीतीने जवानांनासाठी पौष्टिक लाडू पाठविण्याचा संकल्प भाविप संस्थेला पूर्ण करता आला. या उपक्रमाच्या निधी संकलनाकरिता एक मेसेज सोशल मीडियावर प्रसारित केला गेला. त्या माध्यमातून सैनिकांसाठी दिवाळी फराळ नावाने निधी जमा व्हायला सुरुवात झाली. अभियानाची घोषणा केली तेव्हा शाखेने 10 हजार लाडू पाठवायचा संकल्प सोडला होता. अपेक्षेपेक्षा अधिक निधी गोळा झाल्यामुळे संकल्प वाढवून दोन टप्प्यांत एकूण 14 हजार लाडू पाठविता आले. सीमेवर लाडू पाठवताना पहिले पाच हजार लाडू लेह, लडाख येथील हवामानाचा अंदाज घेऊन 11 ऑक्टोबरला पाठवण्यात आले. कारण नोव्हेंबरमध्ये तिथे बर्फ पडायला सुरुवात होत असल्याने वाहतुकीत अडचणी निर्माण होण्याची शक्यता असते. उरलेले नऊ हजार लाडू उधमपूर, मणिपूर, अरुणाचल प्रदेश, मेघालय व आसाम येथे 2 नोव्हेंबर रोजी पाठविण्यात आले आहेत. लाडूंच्या बॉक्सला चार-पाच प्रकारचे पॅकिंग करण्यात आले. याकरिता दोन-तीन वेळा पनवेलहून भाविपचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मिळून 13 जणांची टीम डोंबिवलीला जाऊन सामाजिक अंतर व सामाजिक भान राखून तब्बल 12 तास काम करीत होती.