Breaking News

राज्य सरकारने एसटी कर्मचार्यांची पिळवणूक थांबवावी!; अन्यथा जनआंदोलनाचा भाजपचा इशारा

मुरूड ः प्रतिनिधी

एसटी महामंडळातील चालक-वाहक, तांत्रिक विभाग, लिपिक आदी सर्व घटकाला मागील तीन महिन्यांचा पगार मिळाला नाही. त्यामुळे सर्व कर्मचारी वृंदांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. खोलीचे भाडे व जीवनावश्यक वस्तू खरेदी करता येत नाहीत. सर्वांत कमी पगार एसटीमधील कर्मचार्‍यांना दिला जातो. त्यातच तीन महिने पगार नसल्याने कुटुंबाची परिस्थिती खालावली असून कसे जगायचे, असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. एसटी कर्मचार्‍यांची ही पिळवणूक थांबवा, अन्यथा तालुका भारतीय जनता पक्षातर्फे मोठे जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा मुरूड तालुका भाजप अध्यक्ष महेंद्र चौलकर यांनी मुरूड आगाराला दिला आहे. याबाबतचे रीतसर निवेदन मुरूड आगाराचे प्रमुख सनील वाकचौरे यांना तालुका प्रमुख महेंद्र चौलकर यांच्या हस्ते देण्यात आले. या वेळी भाजप जिल्हा कार्यकारिणी सदस्य अण्णा कंधारे, तालुका उपाध्यक्ष बाळा भगत, सरचिटणीस नरेश वारगे, जीवन सुतार, मुरूड शहर अध्यक्ष उमेश माळी, अब्दुल आदमने, स्वेब डवलापूरकर आदी उपस्थित होते. एसटी कर्मचार्‍यांना वेळेत पगार मिळत नसल्याने कर्मचारी भाजीपाला विकणे, गवंडी काम करणे अशी कामे करून अस्थिर जीवन जगत आहेत. वेळेवर पगार मिळत नसल्याने महामंडळ कर्मचारी मनोज चौधरी याने आत्महत्या केली असून या आत्महत्येस ठाकरे सरकारलाच जबाबदार धरले पाहिजे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. एकीकडे वेतन नाही व दुसर्‍या बाजूने नोकर्‍या टिकणार नाहीत ही चिंता त्यांना सतावत आहे. 50 वर्षे पूर्ण झालेल्या कर्मचार्‍यांना सक्तीने सेवानिवृत्ती घेण्याचा घाट घातला जात आहे. असे करताना कर्मचार्‍यांना विश्वासात घेतले जात नाही. दिवाळीच्या तोंडावर कर्मचार्‍यांना पगार देता येत नसेल तर भाजपला आंदोलनाशिवाय पर्याय नाही. कर्मचार्‍यांची पिळवणूक व शोषण थांबवा, अन्यथा मुरूड आगारासमोर तालुका भाजप मोठे जनआंदोलन छेडेल, असा इशारा तालुका भाजपतर्फे देण्यात आला आहे. हे निवेदन स्वीकारताना आगारप्रमुख सनील वाकचौरे यांनी आश्वासित केले की, आपले निवेदन लवकरच विभाग नियंत्रक कार्यालयात पोहचविले जाईल.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply