निसर्गाने समृद्ध असलेली कोकणची भूमी सध्या मात्र संकटांचा सामना करीत आहे. एका वर्षाच्या आत दुसरी नैसर्गिक आपत्ती कोकणावर आली. गेल्या जूनमध्ये निसर्ग चक्रीवादळाने कोकणाला तडाखा दिला होता. आता तौक्ते चक्रीवादळाने नुकसान केले. कोकणाने राज्याला आजवर खूप काही दिले. आता हे राज्य चालविणार्यांनी कोकणवासीयांना मदत करणे आवश्यक आहे.
वैश्विक महामारी कोरोनाच्या दुसर्या लाटेतून आपला देश जात आहे. महाराष्ट्रासह देशात एकीकडे रुग्णसंख्या काहीशी घटताना दिसत असताना मृत्यूचे प्रमाण मात्र कमी झालेले नाही. विशेषकरून शहरी पट्ट्यानंतर ग्रामीण भागात कोविड-19 विषाणूने विळखा घट्ट केला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील जीवन विस्कळीत झालेले पहावयास मिळते. अशातच कोकण किनारपट्टीवर तौक्ते चक्रीवादळ घोंगावले. या वादळाची तीव्रता निसर्ग चक्रीवादळाएवढी नसली तरी जीवित आणि वित्तनाही झालीच आहे. अनेकांनी पावसाळ्यासाठी केलेली बेगमी या चक्रीवादळात अक्षरश: वाहून गेली. कोकणातील लोक पारंपरिक भातपीक, आंबा, काजू, सुपारी याचे उत्पादन घेत असतात, मात्र वादळात अनेक झाडे उन्मळून पडली, भातपीक भिजले. त्यामुळे शेतकरीवर्ग, बागायतदार हवालदिल झाले आहेत. मच्छीमार तर सततच्या नैसर्गिक संकटांमुळे पुरता बेजार झालेला आहे. आधी कोरोना, लॉकडाऊन, वादळे आणि आता आगामी पावसाळी दोन महिने मासेमारी बंदी या सलग दोन वर्षी बिघडलेल्या हंगामामुळे कोळी बांधव भरडला गेला आहे. अशा या कोकणवासीयांसाठी राज्याचे दोन्ही विरोधी पक्षनेते सर्वप्रथम धावून गेले. विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सहकारी भाजप आमदारांसोबत सर्वप्रथम कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गचा तीन दिवस दौरा केला. या दौर्यात त्यांनी कोकणवासीयांच्या समस्या जाणून घेतल्या आणि याबाबत शासनदरबारी आवाज उठविला. विरोधी पक्षनेत्यांनंतर मुख्यमंत्री महोदयांना कोकणाची आठवण आली. उद्धव ठाकरे यांनी एका दिवसात तोही अवघ्या तीन तासांचा धावता दौरा केला आणि ते ‘मातोश्री’त परतले. वास्तविक, मुख्यमंत्री या नात्याने उद्धव ठाकरेंनी कोकणात व्यवस्थित दौरा करून किती नुकसान झाले आहे आणि किती मदत करायला हवी यासाठी थोडा वेळ काढला पाहिजे होता. कोकणवासीयांनी शिवसेनेलाही भरभरून दिले आहे. त्या बदल्यात शिवसेनेकडून कोकणवासीयांच्या वाट्याला नेहमीच उपेक्षा आली. तौक्ते चक्रीवादळानंतर त्याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला. मुख्यमंत्री कधी आले नि कधी परत गेले हे कळलेदेखील नाही. शिवाय राज्य सरकारमधील मंडळी मदतीसाठी केंद्राकडे बोट दाखवत आहेत. केंद्र सरकारकडून मदत मिळेल तेव्हा मिळेल, पण सध्या राज्य सरकारने नीतीमत्तेची चाड आणि कोकणाने दिलेल्या योगदानाची जाण ठेवून तातडीची आर्थिक मदत घोषित करायला हवी, मात्र मुख्यमंत्री व अन्य मंत्र्यांच्या दौर्यांनंतरही ठोसपणे काही घोषणा झालेली नाही. याउलट विरोधी पक्ष भाजपने आपल्या पातळीवर वादळग्रस्तांना पत्रे आणि कौलांची व्यवस्था करून आधार दिला. कोकणाखेरिज इतर भागांतही चक्रीवादळामुळे नुकसान झाल्याचे चित्र आहे, परंतु कोकणाला वादळाचा जास्त तडाखा बसला आहे. त्यामुळे मदतीत त्यांना प्राधान्य मिळायला हवे, मात्र कोकणवासीयांची आता पुन्हा फसवणूक झाल्यास ते राज्यातील सत्ताधार्यांना माफ करणार नाहीत आणि योग्य वेळी जागा दाखवून देतील.