Sunday , October 1 2023
Breaking News

खालापुरातील वृक्षदूत रामदास काईनकर याचा वृक्ष जगवण्यासाठी धडपडीतून नवा प्रयोग

खोपोली : प्रतिनिधी

पावसाळ्यात सर्वत्र वृक्षारोपणाची मोहीम राबवून दरवर्षी लाखो वृक्षांची लागवड केली जाते, मात्र त्यानंतर वृक्ष संगोपनाबाबत उदासीनता दिसून येते. खालापूर तालुक्यातील वावंढळवाडी गावातील तरुण रामदास कमलाकर काईनकर याची वृक्ष जगविण्याची धडपड वाखाणण्याजोगी आहे. रामदास काईनकर मातीशी नाळ जुळलेला तरुण. तो वीटभट्टी व्यावसायिक आहे, म्हणून मातीशीच नाही, तर पर्यावरणाप्रतिही रामदासचे काम दखल घेण्याजोगे आहे. गेली आठ वर्षे शेकडो झाडे लावून ती जगविण्यासाठी रामदासची धडपड दखल घेण्यासारखी आहे.उन्हाळा सुरू झाला की लागवड केलेल्या वृक्षांकङे लक्ष देण्याची गरज असते. वणव्यापासून ते रखरखीत उन्हाळ्यात पाण्याशिवाय सुकून जाणार्‍या वृक्षांना वाचविण्याची रामदासची धडपड सुरू असते. त्यासाठी त्याने पिंप ट्रॉलीचा प्रयोग केला आहे. दुचाकीला जोडलेल्या ट्रॉलीवर पाण्याचा पिंप ठेवून झाडांना पाणी घालायचे. या दुचाकी ट्रॉलीमुळे रस्ता नसलेल्या आणि पाण्याची सोय नसलेल्या ठिकाणापर्यंत पोहचणे शक्य होते, तसेच एकाच वेळी 200 लिटर पाणी वाहून नेण्याची सोय होत असल्याने वेळ वाचतो, असे रामदास सांगतो. चांगली वाढ झालेले वृक्ष गवत पेटवल्यामुळे होरपळून जातात. अशा वेळी वृक्षांच्या खोङापासून पाच ते सात फुटांपर्यंत गवत काढून मातीची भर दिल्यामुळे वणव्यापासून अनेक वृक्ष वाचविण्यात यश आल्याचे रामदास म्हणाला.गेल्या आठ वर्षांपासून रामदासने साग, वड, पिंपळ, फणस, काजू, कडूनिंब तसेच दुर्मीळ व औषधी वृक्ष लागवड करून त्यांच्या संगोपनाचे काम केले आहे. वृक्ष जगविण्याचा वसा नित्यनेमाने जपत पर्यावरणाशी बांधिलकी जपणार्‍या रामदास काईनकरचे कार्य सुरू असताना कुठेही गाजावाजा नसून त्याचे कुटुंबदेखील या कार्यात हातभार लावत आहेत.

Check Also

रायगडात अन्न व औषध प्रशासनाचे धाडसत्र

26 लाख 81 हजारांच्या माल जप्त; परवाना रद्दचीही कारवाई पेण ः प्रतिनिधी गणेशोत्सवादरम्यान सर्व पदार्थ …

Leave a Reply