पेण : प्रतिनिधी
पेणमधील आई डे केअर संस्थेच्या 40 विशेष गतिमंद मुलांनी व्यावसायिक मार्गदर्शन घेऊन लॉकडाऊनच्या काळात घरच्याघरी यावर्षी 15 हजार विविध प्रकारच्या पणत्या बनविल्या आहेत. त्यातून संस्थेला आर्थिक हातभार तर लागलाच शिवाय काही मुलांनी चांगल्या प्रकारे मानधन मिळविले. आई डे केअर संस्थेत 40 ते 42 विद्यार्थी असून त्यांची गणपती, राख्या तसेच विविध प्रकारच्या पणत्या बनविण्यासाठी मोलाची मेहनत असते. या मुलांनी दिवाळीनिमीत्ताने विविध प्रकारच्या 15 हजार पणत्या तयार केल्या असून उज्वला म्हात्रे, शिल्पा पाटील, निशा पाटील, हर्षदा म्हात्रे, तसेच वैभव, रत्नाकर, चेतन, अपूर्व या विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी पणत्यांचे रंगकाम पूर्ण केले आहे. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना लॉकडाऊन काळातही चांगल्या प्रकारचे मानधन मिळणार असल्याने संस्थेचे अध्यक्ष व शिक्षिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
मुंबईमधील गिव्हींग केअर ही संस्था आणि तळोजा येथील गॅलक्सी कंपनी यांनी दिलेल्या ऑनलाईन ऑर्डरनुसार संस्थेच्या 40 मुलांनी विविध प्रकारच्या 15 हजार पणत्या तयार केल्या असून, त्या पॅक करुन पाठविण्यात आल्या आहेत..
-स्वाती मोहिते, अध्यक्षा, आई डे केअर संस्था, पेण