नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
उच्च शिक्षणासाठी भारतीय विद्यार्थ्यांचा कल आता ऑस्ट्रेलियाकडे वाढत चालला आहे. ऑस्ट्रेलियन विद्यापीठात प्रवेश घेणार्या भारतीय विद्यार्थ्यांच्या संख्येत गतवर्षाच्या तुलनेत 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 2018मध्ये जवळपास एक लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी शिक्षणासाठी ऑस्ट्रेलियातील विद्यापीठांमध्ये अर्ज केला आहे. ऑस्ट्रेलियन सरकारने जारी केलेल्या परदेशी विद्यार्थ्यांच्या यादीतून ही आकडेवारी समोर आली आहे. ऑस्ट्रेलियात शिकण्यासाठी येणार्या विद्यार्थ्यांमध्ये चिनी विद्यार्थ्यांचा सर्वाधिक समावेश आहे. चीनमधल्या 2 लाख 55 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी 2018 वर्षात ऑस्ट्रेलियात शिक्षणासाठी प्रवेश केला. चिनी विद्यार्थ्यांचा आकडा हा 2017च्या तुलनेत 10 टक्क्यांनी वाढला आहे.
चीनच्या खालोखाल भारताचा क्रमांक आहे. ऑस्ट्रेलियात शिकण्यासाठी येणारे दुसर्या क्रमांकाचे सर्वाधिक विद्यार्थी हे भारतीय आहेत, असे आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. 2017मध्ये जवळपास 87 हजार भारतीय विद्यार्थ्यांनी शिक्षणासाठी ऑस्ट्रेलियातील विद्यापीठ आणि इतर शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेतला होता. 2018मध्ये 1 लाख 8 हजारांहून अधिक भारतीय विद्यार्थी ऑस्ट्रेलियात शिकण्यासाठी आले आहेत. या आकडेवारीत 25 टक्क्यांची वाढ झालेली पाहायला मिळत आहे. चीन, भारतापाठोपाठ नेपाळी विद्यार्थ्यांचाही यात समावेश आहे. या सर्व विद्यार्थ्यांची पसंती ही सिडनी, मेलबर्न, गोल्ड कोस्ट येथील विद्यापीठांना दिसून येत आहे.