Tuesday , February 7 2023

आखाडा रंगू लागलाय

राजकारण असो वा कुस्तीचा आखाडा तो रंगला तरच बघायला मजा येते. रायगड आणि मावळ या लोकसभा मतदारसंघात देखील या वेळी चुरशीच्या निवडणुका होणार असल्याने या दोन्ही मतदारसंघांकडे रायगडवासीयांचे लक्ष लागून राहिलेले आहे. कोण जिंकणार, कोण हरणार यावर जिल्ह्याचे पुढील राजकारण निश्चित होणार आहे, हे नक्की.

रायगड जिल्ह्यातील राजकीय आखाडा आता चांगलाच रंगू लागलाय. उन्हाच्या तडाख्याबरोबरच राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैर्‍याही राजकीय पक्षांकडून होऊ लागल्याने जिल्ह्याचे राजकीय वातावरण आता चांगलेच तापले आहे. आणखी महिनाभर तरी ही गरम हवा राहणार आहे. यापुढे प्रचाराला आणखी धार येणार असल्याने नेमके कोण बाजी मारणार याविषयी कमालीची उत्सुकता लागून राहिलेली आहे. रायगडचे राजकारण हे नेहमीच जगावेगळे राहिलेले आहे. देशात वा राज्यात कुणाचीही हवा असो रायगड अशा हवेपासून नेहमीच दूर राहून आपली स्वतःची हवा निर्माण करीत आलेला आहे. त्यामुळे रायगडचा निकाल काय लागेल याबाबत सार्‍यांनाच उत्सुकता लागलेली आहे. मागील निवडणुकीत देशात मोदी लाट असताना देखील काँग्रेस, राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांना निसटता पराभव सहन करावा लागला. त्यामुळे या वेळी विद्यमान खासदार अनंत गीते यांची कसोटी पाहणारी ही निवडणूक ठरणार आहे. तशीच तटकरे यांच्या राजकीय भवितव्याचा फैसला देखील या वेळी होणार आहे. तटकरेंना शेकाप, काँग्रेसची साथ असली, तरी गीतेंनी या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना गनिमी काव्याने आपलेसे करण्यास सुरुवात केल्याने तटकरेंचा मार्ग खडतर होऊ लागलाय, मुळात या दोन्ही पक्षांच्या निष्ठांवत कार्यकर्त्यांना आपल्या नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमवेत केलेली आघाडीच मुळी पसंत नाही. केवळ दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी आपापल्या स्वार्थासाठी ही आघाडी केली असल्याचे या दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आता उघड उघडपणे बोलू लागलेले आहेत. त्यामुळे निवडणुकीत तटकरेंना धडा शिकवून शेकाप, काँग्रेसच्या नेत्यांना वठणीवर आणण्याचा पणच या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी केला असल्याचे स्पष्ट दिसत आहे. तसे जर घडले तर खरोखरच रायगडचा निकाल निश्चितच आशादायी लागेल. सध्या दोन्ही उमेदवारांनी आपापले अर्ज दाखल केलेले आहेत. आता पुढील 15 दिवस परस्परांवर आरोप, प्रत्यारोपाच्या फैरी दोन्ही बाजूकडून झाडल्या जातील आणि मतदारांची, सर्वसामान्यांची करमणूक होईल. रायगडप्रमाणेच मावळ मतदार संघातही सध्या निवडणुकीची लगीनघाई सुरू झालेली आहे. मावळमध्ये रायगडातील पनवेल, उरण, कर्जत या तीन विधानसभा मतदारसंघांचा समावेश असल्याने या तीन मतदारसंघातील राजकीय वातावरणही वेगळे आहे. मावळमध्ये शिवसेनेला भाजपची भक्कम साथ असल्याने शिवसेना, भाजप, रिपाइं महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांचा विजय तसा सुकर झाला आहे, पण या वेळी त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीने पार्थ पवार यांना उमेदवारी दिल्याने निवडणुकीत चुरस निर्माण झालेली आहे. पार्थ पवारांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, अजित पवार हे डोळ्यात तेल घालून लक्ष देत आहेत. त्यामुळे या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागलेले आहे. एकूणच रायगड असो वा मावळ या दोन्ही मतदारसंघांतील आखाडा आता चांगलाच रंगू लागलाय, हे नक्की.

Check Also

मुंबई-गोवा महामार्गाच्या कामास पूर्णत्वाची प्रतीक्षा

स्थानिक प्रशासनाकडून आवश्यक त्या परवानग्या मिळवून देण्यात काही अवधी लागत असल्याने मुंबई-गोवा महामार्गाचे महाडमधील काम …

Leave a Reply