Thursday , March 23 2023
Breaking News

सुनीत जाधवच ‘भारत श्री’

मुंबई : प्रतिनिधी

सुनीत जाधवला फक्त सुनीत जाधवच हरवू शकतो. हे सुनीत जाधवचं बोल खरे ठरले. काहींनी सुनीतला स्वतःबद्दल अतिआत्मविश्वास असल्याचे टोमणे मारले होते, पण सुनीतने चेन्नईत झालेल्या 12व्या राष्ट्रीय अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धेत आपणच सुलतान असल्याचे दाखवून दिले. गतवर्षी राम निवासकडून पराभूत झालेल्या सुनीतने आपल्या पराभवाचा वचपा काढत चार वर्षांत तिसर्‍यांदा भारत श्री जिंकण्याची करामत केली.

इंडियन बॉडीबिल्डर्स फेडरेशनच्या मान्यतेने झालेल्या या स्पर्धेची चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्सची झुंज सुरू होती. सारेच खेळाडू जबरदस्त दिसत होते, पण शेवटचे तीन गट म्हणजे काँटे की टक्कर.जेतेपदासाठी सुनीत जाधव, दिल्लीचा नरेंदर यादव आणि सेनादलाच्या अनुज कुमार तालियन यांच्यात कंपेरिझन करण्याचा निर्णय परीक्षकांनी घेतला आणि अन्य सात खेळाडूंचे आभार मानले.

तिन्ही खेळाडू ज्या विश्वासाने मंचावर आले, त्या वेळी वाटत होते हे तिघेही विजेतेच आहेत. कंपेरिझन झाल्यानंतर दुसर्‍या मिनिटाला परीक्षकांनी नरेंदर आणि अनुजला पुन्हा कंपेरिझनला बोलावले तेव्हा अक्षरशः हृदयाचा ठोका चुकला. ही कंपेरिझन पहिल्या स्थानासाठी होती की दुसर्‍या आणि तिसर्‍या स्थानासाठी. सुनीतचे चाहतेहीही कंपेरिझन पाहून थोडेसे शांत झाले. सुनीतही शांत झाला, पण कंपेरिझननंतर जेव्हा नरेंदर यादवला तिसरा क्रमांक जाहीर केला तेव्हा महाराष्ट्राच्या चाहत्यांनी एकच जल्लोष केला. कारण झालेली कंपेरिझन दुसर्‍या आणि तिसर्‍या स्थानासाठी होती, हे तेव्हा स्पष्ट झालं. गेल्या वेळी हुकलेलं जेतेपद सुनीत जाधवने पुन्हा खेचून आणलं. आशिया श्री आणि सहा वेळा महाराष्ट्र श्री जिंकणारा सुनीत तिसर्‍यांदा भारत श्री ठरला. हा एक विक्रमच म्हणावा लागेल. सुनीत जाधवपाठोपाठ मुंबईकर अनिल बिलावानेही सर्वांचं लक्ष वेधलं. त्याने मुंबई श्री जिंकण्याचा भीमपराक्रम केला.

Check Also

सराईत सोनसाखळी चोरांना अटक

जवळपास पावणेपाच लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत पनवेल : वार्ताहर खारघर, उलवेसह नवी मुंबई परिसरात …

Leave a Reply