अलिबाग : जिमाका
निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतरच्या कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विविध पथकांनी रायगड जिल्ह्यात कारवाई करून सुमारे 75 हजार लिटर्स मद्य जप्त केले, अशी माहिती विभागाच्या अधीक्षक सीमा झावरे यांनी दिली. जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी यासंदर्भात कारवाईचा वेग वाढविण्याची आणि कोणत्याही परिस्थितीत नियमबाह्य प्रकारांना रोखण्यासाठी पावले उचलली आहेत. निवडणुकीच्या काळात गावठी दारू भट्ट्या आणि वाहतुकीवरसुद्धा पोलिसांनी धाडी टाकून मोठ्या प्रमाणावर साहित्य जप्त केले आहे.
गेल्या महिन्याभरात एकंदर 186 प्रकरणे दाखल केली गेली आणि 97 जणांना अटक करण्यात आली. जप्त केलेल्या दारूमध्ये हातभट्टी 2807 लिटर्स, 70 हजार 435 लिटर रसायन, देशी दारू 227 लिटर, 194 लिटर बिअर यांचा समावेश आहे. आत्तापर्यंत नऊ वाहने जप्त करण्यात आली असून, त्यांची किंमत सात लाख 56 हजार इतकी होते. इतर मुद्देमाल व साहित्य 26 लाख 32 हजार 123 रुपयांचे आहे. अशा रीतीने 33 लाख 88 हजार 123 रुपयांच्या मुद्देमालाची जप्ती करण्यात आली आहे.