महापालिकेतर्फे जागरूक पालक सुदृढ बालक अभियान
पनवेल : प्रतिनिधी
शासनाच्यावतीने 9 फेब्रुवारीपासून जागरूक पालक, सुदृढ बालक अभियान राज्यात सुरू करण्यात आले आहे. पनवेल महापालिकेने या अभियानांतर्गत 25 हजार 770 बालकांची आरोग्य तपासणी केली. यामुळे बालकांमधील आजारांचे वेळीच निदान होऊन त्यांच्यावर उपचार करण्यास मदत होत आहे. बालकांचे आरोग्य सदृढ रहावे यासाठी शासनाच्या वतीने ’जागरूक पालक, सुदृढ बालक’ अभियान सुरू करण्यात आले आहे. महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली या अभियानांतर्गत पनवेल महापालिकेने आतापर्यंत 25 हजार 770 बालकांची आरोग्य तपासणी केली आहे. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार जिल्हा आरोग्य प्रशासनाच्या वतीने जागृत पालक सुदृढ बालक अभियान राबविण्यात येत आहे. दोन महिने राबविण्यात येणार्या या अभियानासाठी पालिकेच्या वतीने 20 आरोग्य पथके तयार करण्यात आलीले आहेत. त्यामध्ये महापालिकेच्या परिचारिका, एमजीएम महाविद्यालयाकडून डॉक्टर्स, नर्सेस तसेच राष्ट्रीय बाल सुरक्षा कार्यक्रम अंतर्गत वैद्यकीय अधिकार्याची दोन पथके, सामुदायिक आरोग्य अधिकारी यांच्या मार्फत महापालिका क्षेत्रातील बालकांची तपासणी करण्यात येत असल्याची माहिती मुख्य वैद्यकिय अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांनी दिली. जिल्ह्यातील शून्य ते सहा वर्ष वयोगटातील अंगणवाडी, बालवाडी व खासगी नर्सरीतील बालके, 6 ते 18 वर्ष वयोगटातील शासकीय, खाजगी शाळा, अनुदानित शाळा दिव्यांग शाळा व आश्रमशाळेतील, महाविद्यालयातील विद्यार्थाची तसेच शाळा बाह्य मुले अशी एकुण दीड लाख मुलांची तपासणी करण्यात येणार आहे. याकामामध्ये रोटरी क्लब ऑफ पनवेल महापालिकेस सहकार्य करत आहे. पनवेल शहरामधील के. व्ही. कन्या प्रशाला आणि व्ही. के. हायस्कूलमधील विद्यार्थ्यांच्या तपासणीसाठीकरिता त्यांनी सहकार्य केले आहे. आत्तापर्यंत तपासणी झालेल्या 25 हजार 770 बालकांपैकी एक हजार 465 बालकांची अधिक तपासणी करण्यात येणार आहे. यापैकी पाच बालकांना शस्त्रक्रियेकरिता पाठवण्यात येणार आहे.
वयोगटानुसार तपासणी
जागरूक पालक, सुदृढ बालक अभियानांतर्गत 0-18 वर्षे वयोगटातील एकुण 25 हजार 770 मुलांची तपासणी पूर्ण करण्यात आली आहे. 0-6 वर्षे वयोगटातील तीन हजार 331 मुले तपासणी पूर्ण करण्यात आली आहे. 6-10 वर्षे वयोगटातील सहा हजार 967 विद्यार्थी तपासणी पूर्ण करण्यात आली आहे. 10-18 वर्षे वयोगटातील 15 हजार 320 विद्यार्थी तपासणी पूर्ण करण्यात आली आहे.