- मुंबईतील ‘प्रकाशगडा’वर धडक
- राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी
मुंबई : प्रतिनिधी
वाढीव वीज बिलांविरोधात भारतीय जनता पक्ष आक्रमक झाला असून, महिला मोर्चातर्फे महावितरणच्या मुंबईतील कार्यालयावर शुक्रवारी (दि. 20) मोर्चा काढण्यात आला. भाजपच्या रणरागिणींनी अनवाणी प्रकाशगड कार्यालयावर धडक दिली. राज्य सरकार प्रेतावरच्या टाळूवरचे लोणी खाणारे आहे, जनतेला फसवून हे सरकार सत्तेत बसले आहे, अशी टीका या वेळी महिला मोर्चाच्या नेत्या रितू तावडे यांनी केली, तर महिला कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडी सरकारविरोधात घोषणाबाजी केली.
राज्यात वीज ग्राहकांवर वाढीव वीज बिलांचा भार आहे, पण सरकारने कोणताही दिलासा दिलेला नाही. त्यामुळे भाजपने राज्य सरकारविरोधात येत्या सोमवारी राज्यव्यापी वीज बिल होळी आंदोलन पुकारले आहे. त्याआधीच महिला मोर्चाच्या वतीने महावितरणच्या मुंबईतील प्रकाशगड कार्यालयावर मोर्चा काढून संताप व्यक्त करण्यात आला.
लॉकडाऊनच्या काळात वीज ग्राहकांना वाढीव बिले आली. या बिलांमधून दिलासा देण्याची मागणी होत होती. वाढता दबाव पाहून सुरुवातीला ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी यातून दिलासा मिळेल, असे म्हटले होते, मात्र नंतर त्यांनी यू-टर्न घेत कोणताही दिलासा ग्राहकांना मिळणार नाही. जी वीज वापरली आहे त्याचे बिल भरावेच लागेल अशी भूमिका घेतली. त्यामुळे लोक संतापले आहेत. जनतेचा हा आवाज भाजप बुलंद करीत आहे.