Breaking News

महाडमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याला मारताना आजोबांचा नेम चुकला

बंदुकीच्या गोळीने नातू जखमी

महाड : प्रतिनिधी
पिसाळलेल्या कुत्र्याला मारताना आजोबांच्या बंदुकीतून सुटलेली गोळी नातवाच्या लागल्याने तो जखमी झाल्याची घटना महाड तालुक्यातील कोकरे गावात घडली आहे. कविराज साळवी (वय 31) असे जखमी तरुणाचे नाव असून, सुदैवाने तो वाचला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून महाड तालुक्यातील कोकरे गावातील एक कुत्रा पिसाळला असल्याने गावकरी त्रस्त झाले आहेत. या कुत्र्याला मारण्यासाठी गावकर्‍यांनी विविध प्रकारचे प्रयत्न केले, पण प्रत्येक वेळेस कुत्रा बचावला. याचदरम्यान गावातील सेवानिवृत्त सैनिक असलेले यशवंत साळवी यांनी आपली नळीची बंदूक घेऊन या पिसाळलेल्या कुत्र्याला मारण्याचा प्रयत्न केला. या वेळी त्यांनी कुत्र्यावर नेम धरला असता, तो पसार झाला आणि बंदुकीतून निघालेली गोळी त्यांचा नातू कविराज साळवी याला लागली. त्यात कविराज जखमी झाला. ही गोळी कविराज याच्या कमरेला घासून गेली. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आजोबांविरोधात आपली कोणतीही तक्रार नसल्याचे कविराज याचे म्हणणे आहे.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply