खालापूर : प्रतिनिधी
कर्जत-पनवेल या रेल्वेच्या दुपदरीकरणासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी मोबदला ठरलेला नसतानाही चौक येथील दलित वस्तीमधील 29 घरे व जागा संपादित करण्याचा चंग कर्जत प्रांताधिकारी कार्यालयाने बांधला आहे, मात्र त्यास या वस्तीमधील रहिवाशांचा विरोध आहे. आम्हाला आमच्या घरांचा मोबदला व पर्यायी जागा द्या, तोपर्यंत घराच्या एकाही विटेला हात लावू देणार नाही, असा ठाम निर्धार या रहिवाशांनी केला आहे. कर्जत-पनवेल रेल्वेमार्गाच्या दुपदरीकरणासाठी जागा संपादन करून देण्याचे काम रायगडचे जिल्हाधिकारी व कर्जत प्रांताधिकारी यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. या रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणासाठी खालापूर तालुक्यातील चौक येथील दलित वस्तीमधील 29 घरे व जागा संपादित करण्यात येणार आहे, मात्र त्याचा मोबदला व घरांसाठी पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याच्या आधीच तेथील घरे व जागा संपादित करण्याचे प्रयत्न कर्जत प्रांताधिकार्यांकडून सुरू असल्याचा या वस्तीमधील ग्रामस्थांचा आरोप आहे. या दलित वस्तीचे पुनर्वसन चौकमधील एका खासगी जागेवर करण्याचे प्रांताधिकार्यांंनी ठरविले होेते, पण तेथे दफनभूमी असल्याने ती जागा घेण्यास दलित वस्तीमधील ग्रामस्थांचा विरोध आहे. चौक ग्रामपंचायत हद्दीत असणार्या शासनाच्या मोकळ्या जागेमध्ये आमचे पुनर्वसन करा, घरांचा मोबदला तसेच जागेची किंमत ठरवून द्या, अशी या ग्रामस्थांची मागणी आहे. दरम्यान, रेल्वे प्रशासनाने तगादा लावल्याने कर्जत प्रांताधिकारी कार्यालय जमीन संपादनासाठी दबाव आणत असल्याचा आरोप चौक दलित वस्तीमधील रहिवासी करीत आहेत.
550 खातेदार होणार बाधित
कर्जत-पनवेल रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणात खालापूर तालुक्यातील सात आणि कर्जत तालुक्यातील सहा गावांतील 550 खातेदार बाधित होणार आहेत. त्यापैकी नढाळ आदिवासीवाडीमधील नारायण कातकरी यांच्या आठ गुंठे जागेसाठी अल्प मोबदला ठरवला असून, या जागेच्या भूसंपादनाला या आदिवासी शेतकर्याने विरोध दर्शविला आहे, तर आपल्या जमिनीचा मोबदला मिळावा यासाठी काही शेतकरी प्रांत कार्यालयात हेलपाटे मारत आहेत. कर्जत तालुक्यातील किरवली, देऊळवाडी या गावांतील शेतकर्यांना अद्याप मोबदला मिळाला नसल्याचे समोर येत आहे.
या प्रकल्पासाठी जागा संपादित करण्याचे काम जिल्हाधिकारी व कर्जत प्रांताधिकारी यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. चौक गावठाणमधील 29 घरांचे सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत सर्वेक्षण करण्यात आल्यानंतर त्यांचा भूसंपादन कायद्याप्रमाणे मोबदला ठरविण्यात येणार आहे.
-ब्रिज किशोर, भूसंपादन अधिकारी, मध्य रेल्वे
चौक दलित वस्तीमधील ग्रामस्थांनी सर्वेक्षण करू दिले नसल्यानेतेथील भूसंपादनास विलंब झाला आहे. सर्वेक्षणानंतर मोबदला ठरविण्यात येणार आहे.
-पुरुषोत्तम थोरात, नायब तहसीलदार, प्रांताधिकारी कार्यालय, कर्जत