Breaking News

नवी मुंबई प्रथम क्रमांकाचे स्वच्छ शहर बनेल

आमदार गणेश नाईक यांचा विश्वास; स्वच्छता, वृक्षारोपण अभियानाचा शुभारंभ

नवी मुंबई ः बातमीदार

नागरिक, लोकप्रतिनिधी, प्रशासन तसेच स्वयंसेवी संस्थांनी कृतिशील संकल्प केल्यास नवी मुंबई शहर स्वच्छ भारत अभियानात नक्कीच प्रथम क्रमांक पटकावेल, असा विश्वास आमदार गणेश नाईक यांनी व्यक्त केला. भारत स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत ग्रीन होप, संत निरंकारी चॅरिटेबल ट्रस्ट व मध्य रेल्वेच्या संयुक्त विद्यमाने रेल्वेस्थानक परिसरात स्वच्छता व वृक्षारोपण अभियान सुरू करण्यात आले आहे. त्याचा शुभारंभ आमदार गणेश नाईक यांच्या हस्ते मंगळवारी (दि. 1) कोपरखैरणे स्थानक परिसरात झाला. त्या वेळी उपस्थितांसमोर आमदार नाईक यांनी आपले विचार मांडले.

कार्यक्रमात कोरोनाविषयक खबरदारीचे काटेकोरपणे पालन करण्यात आले. मध्य रेल्वे मंडळ, संत निरंकारी चॅरिटेबल ट्रस्ट, एनएसएस, विविध स्वयंसेवी संस्था, लोकप्रतिनिधी, नागरिक या सर्वांच्या विद्यमाने ही मोहीम पार पडणार आहे. माजी खासदार डॉ. संजीव नाईक, ग्रीन होपचे अध्यक्ष तथा माजी आमदार संदीप नाईक, पालिकेच्या घनकचरा विभागाचे उपायुक्त बाबासाहेब राजळे, मध्य रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी आशुतोष गुप्ता, गौरव झा, मोहित सिंग, संदीप तिवारी, निरज झा, शंकर नारायण, श्रमिक शिक्षण मंडळाचे सचिव सुरेशदादा नाईक यांसह माजी नगरसेवक, ज्यांच्या सहकार्याने हा उपक्रम हाती घेण्यात आला त्यांचे प्रतिनिधी शुभारंभ कार्यक्रमास उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील भारत स्वच्छ सर्वेक्षण अभियानात मागील वर्षी नवी मुंबईला महाराष्ट्रात पाहिला आणि देशात तिसर्‍या क्रमांकाचा बहुमान मिळाला. या यशावर समाधानी न राहता देशात पहिला नंबर येण्यासाठी नवी मुंबईतील सर्व घटकांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन आमदार गणेश नाईक यांनी केले. नवी मुंबईतील रेल्वेस्थानकांचा ताबा सिडकोकडे आहे, मात्र स्वच्छता व देखभालीकडे सिडकोचे दुर्लक्ष झाले आहे. याविषयी सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांना पत्र लिहिणार आहे. लवकरच सिडको, नवी मुंबई पालिका, एमआयडीसी, एमएमआरडीए, पीडब्ल्यूडी अशा सर्वच सरकारी व निमसरकारी विभागांची संयुक्त बैठक घेऊन नवी मुंबईतील स्वच्छता व देखभालीबद्दल चर्चा करणार आहे. रेल्वेस्थानकात येणार्‍या प्रवाशांसाठी स्वच्छतेबरोबरच सुरक्षित वातावरण निर्माण करण्याची गरज असल्याचेही आमदार गणेश नाईक यांनी या वेळी नमूद केले.

कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊन काळात प्रशासकीय यंत्रणांमध्ये काहीशी मरगळ आली होती. ती झटकून टाकणे आवश्यक होते, असे मत माजी आमदार संदीप नाईक यांनी या वेळी मांडले. स्वच्छता राखून आपण कोरोनाला दूर ठेवू शकतो. भारत स्वच्छ सर्वेक्षणात या वर्षी देशात पहिला नंबर प्राप्त करायचा असेल, तर स्वच्छता ही कुणा एकाची नसून सर्वांची जबाबदारी आहे हे ध्यानात घ्यायला हवे. स्वच्छता एका दिवसासाठी नाही तर कायमची सवय करावी. रेल्वेस्थानकांच्या देखभालीकडे सिडकोचे लक्ष नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

दुसर्‍यांकडे बोट दाखविण्यापूर्वी आपण स्वच्छतेचे काम स्वतःपासून सुरू करायला हवे. त्या भूमिकेतून हे स्वच्छता अभियान हाती घेतले आहे, मात्र प्रशासकीय यंत्रणांनीदेखील त्यांची जबाबदारी ओळखून वेळीच काम केले पाहिजे. सध्या ही मोहीम नवी मुंबईतील सर्व रेल्वेस्थानकांपुरती मर्यादित असली तरी भविष्यात ती संपूर्ण नवी मुंबई शहरात राबविण्याचा माजी आमदार संदीप नाईक यांचा मनोदय आहे.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply