समायोजन आणि इंटरनेटअभावी खातेदारांची गैरसोय
कर्जत : बातमीदार
वेळोवेळी डिस्कनेट होणारे इंटरनेट तसेच दोन बँकांच्या समायोजनामुळे देना बँकेच्या कळंब (ता. कर्जत) शाखेतील सर्व व्यवहार थंडावले आहेत. त्यामुळे कळंब परिसरातील 25-30 गावे, वाड्यामधील खातेदारांना बँकेतून हात हलवत घरी परतावे लागत आहे.
कर्जत तालुक्यातील कळंब येथे 1990च्या दशकात देना बँक आली. बँकेच्या या शाखेत कळंबपासून झुगरेवाडीपर्यंत आणि पुढे खांडस, नांदगाव, वारे आणि पाषाणे तसेच अवसरेपर्यंतच्या गावातील सुमारे 10 हजाराहून अधिक ग्राहकांची खाती आहेत. त्यात मोठ्या प्रमाणावर आदिवासी खातेदार आहेत. मात्र गेल्या काही महिन्यापासून बँकेची इंटरनेट सेवा देणारे सर्व्हर डाऊन झाले आहे. त्यामुळे तेथे खातेदारांना व्यवस्थित सेवा मिळत नाही. ज्यांच्याकडे वाहने आहेत, अशा खातेदारांनी नेरळ, कशेळे, कडाव किंवा कर्जतसारख्या ठिकाणी जाऊन तेथील बँकेत खाती काढली आहेत.
दरम्यान, देना बँकेचे समायोजन बँक ऑफ बरोडामध्ये करण्यात आले आहे. त्यामुळे देना बँकेच्या कळंब शाखेतील ग्राहकांना आपली खाती, पासबुक आणि चेक बुक बदलून घ्यावे लागत आहेत. त्यासाठी बँकेच्या या शाखेत खातेदारांची झुंबड उडत आहे. परिणामी या सर्व खातेदारांना आता आपल्या खात्यातील पैसे काढण्याची मुभा राहिली नाही. या बँकेने सर्व खातेदारांना एसएमएसद्वारे बँकेतील कामाची माहिती द्यावी, जेणेकरून खातेदारांना दूर वरून येऊन रिकाम्या हाताने परत जावे लागणार नाही, असे येथील सामाजिक कार्यकर्ते शाहनाज लोगडे यांनी सांगितले.
इंटरनेटची समस्या आणि बँकांच्या समायोजनामुळे देना बँकेच्या कळंब शाखेच व्यवहार ठप्प झाले आहेत. बँकेच्या या शाखेत आमच्या आदिवासी खातेदारांना घरखर्चाला पैसे काढता येत नसल्याने त्यांच्यावर उधारीने पैसे घेण्याची वेळ आली आहे.
-धर्मा निर्गुडा, माजी सरपंच, कळंब ग्रुपग्रामपंचायत