Breaking News

भारताच्या विकासात दूरसंचार क्षेत्राची मोलाची भूमिका; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (दि. 8) इंडिया मोबाइल काँग्रेसच्या कार्यक्रमाला संबोधित केले. भारताच्या विकासात दूरसंचार क्षेत्राने मोलाची भूमिका साकारली असून, कोरोना काळातही तंत्रज्ञानाची मोलाची मदत झाल्याचे त्यांनी या वेळी नमूद केले, परंतु अजून आपल्याला खूप मोठा पल्ला गाठायचा असल्याचेही ते म्हणाले. या कार्यक्रमास दूरसंचारमंत्री रविशंकर प्रसाद, रिलायन्स समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांच्यासह अनेक दिग्गज उपस्थित होते. पंतप्रधान मोदी म्हणाले, आज देशात आणि जगावर मोबाइलने मोठा प्रभाव टाकला आहे. 10 वर्षांपूर्वी याचा अंदाज वर्तवणेही कठीण होते. शेती, आरोग्य, शिक्षण आणि अन्य क्षेत्रांमध्ये याद्वारे सामान्य लोकांच्या जीवनात कसा बदल घडवता येऊ शकतो यावर आपल्याला लक्ष देणे गरजेचे आहे. कोरोना काळात दूरसंचार क्षेत्राने महत्त्वाची भूमिका बजावली. लोकांना त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधता आला, डॉक्टरांना रुग्णांची मदत करता आली आणि सरकारचे म्हणणेही लोकांपर्यंत पोहोचवता आले. केंद्र सरकारचे नवे धोरण दूरसंचार क्षेत्राला पुढे नेणारे आणि सामान्य लोकांपर्यंत पोहोचण्यासही मदत करणारे असल्याचे पंतप्रधान मोदींनी सांगितले. आज कोट्यवधी लोकांकडे मोबाइल आहेत. प्रत्येकाची आपली डिजिटल ओळख आहे. यामुळे सरकारला सामान्यांपर्यंत मदत पोहोचवणे सहजरित्या शक्य होत आहे. ग्रामीण भागांमध्येही डिजिटली अ‍ॅक्टिव्ह लोकाची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अब्जावधींमध्ये कॅशलेश ट्रान्झॅक्शन्स केली जात आहे. आपल्याला देशातील दूरसंचार क्षेत्राला ग्लोबल हब बनवायला हवे, असेही पंतप्रधान म्हणाले.

‘रिलायन्स जिओ’कडून 5जीची घोषणा

इंडिया मोबाइल काँग्रेसच्या कार्यक्रमात रिलायन्स समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी देशात पुढील वर्षी 5जी सेवा सुरू करण्याची घोषणा केली. ‘2021 या वर्षात रिलायन्स जिओ देशात 5जीची क्रांती घेऊन येणार आहे. संपूर्ण नेटवर्क हे स्वदेशीच असणार आहे. याव्यतिरिक्त हार्डवेअर आणि तंत्रज्ञानही स्वदेशीच असेल. जिओद्वारे आम्ही आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण करणार आहोत’, असेही अंबानी यांनी सांगितले.

Check Also

उलवे पोलीस ठाण्याचे शानदार उद्घाटन

परिसरातील नागरिकांना न्याय मिळेल -आमदार महेश बालदी उलवे नोड ः रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी …

Leave a Reply