अलिबाग : प्रतिनिधी
राज्यात येत्या 12 आणि 13 डिसेंबर रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार महामेळाव्याचे ऑनलाइन आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात राज्यातील विविध खासगी कंपन्यांमध्ये सुमारे 65 ते 70 हजार रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. ww.roigar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर हा रोजगार महामेळावा होणार आहे. यामध्ये रायगड जिल्ह्यासह राज्यातील विविध उद्योग-व्यवसाय यांना नववी उत्तीर्णपासून दहावी, बारावी, आयटीआय, डिप्लोमा, कोणत्याही विषयातील पदवी तसेच बीई आणि इतर व्यावसायिक शैक्षणिक पात्रतेची रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. रायगड जिल्ह्यातील सेक्युरिटी अॅण्ड इंटेलिजन्स सर्विस इंडिया लिमिटेड, जॉन्सन मॅथ्यू केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड तळोजा, पोस्को महाराष्ट्र स्टील प्रायव्हेट लिमिटेड, मॅट3 एक्स इंजीनियरिंग सर्विस, स्मायली हाऊसिंग डेव्हलपमेंट प्रायव्हेट लिमिटेड, एस. पी. कॅड सर्विसेस, यशस्वी अकॅडमी फॉर स्किल्स, स्माईल इंट्रा ट्रेड प्रायव्हेट लिमिटेड, क्रिस्टल इंडिया लिमिटेड पाताळगंगा, इन्नोवस्यन्थ टेक्नॉलॉजीस इंडिया लि., टाटा स्टील बीएसएल लिमिटेड, ऐझिस ग्लोबल, अपकोटेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड तळोजा, एल अॅण्ड टी कन्स्ट्रक्शन स्किल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट पनवेल, सक्षम स्किल कॅडमी, प्रगती आय. टी. सर्विसेस, क्रिस्टल प्रायव्हेट लिमिटेड, सी. जी. मोटर्स, सी. जी. मोटर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, क्रेविडा आदी या आस्थापनांनमध्ये सुमारे दोन हजार रिक्त पदांची भरती होणार आहे. इच्छुक युवक-युवतींनी 13 डिसेंबरपर्यंत पसंतीक्रम नोंदवून या रोजगाराच्या महापर्वणीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त शा. गि. पवार यांनी केले आहे.
अशी करा ऑनलाइन नोंदणी
नोकरीसाठी इच्छूक युवक-युवतींसाठी संकेतस्थळ www.rojgar.mahaswayam.gov.in होमपेजवरील जॉब सीकर (Job Seekar) नोकरी साधक या लॉगिनमधून युजर आयडी आणि पासवर्डच्या आधारे लॉग-इन करावे. त्यानंतर डॅशबोर्डमधील पंडित दीनदयाळ उपाध्याय जॉब फेअर यावर क्लिक करून प्रथम मुंबई विभाग आणि त्यानंतर रायगड जिल्हा निवडून त्यातील STATE LEVEL MEGA JOB FAIR या रोजगार मेळाव्याची निवड करावी व आपला पसंतीक्रम निवडावा. या मेळाव्यात महाराष्ट्रातील कोणत्याही नोकरीसाठी इच्छुक उमेदवारास सहभाग नोंदविता येईल. यानंतर उद्योजकनिहाय रिक्त पदांची माहिती घ्यावी. आवश्यक पात्रतेनुसार ऑनलाइन पद्धतीने पसंतीक्रम नोंदवून मेळाव्यात सहभागी होता येईल.