मुरूडमध्ये दैनंदिन व्यवहार सुरळीत
मुरुड : प्रतिनिधी
केंद्र सरकारने आणलेला कृषी कायदा रद्द करण्याकरिता देशभरातील शेतकर्यांनी दिल्ली येथे पुकारलेल्या आंदोलनाला पुकारण्यात आलेल्या भारत बंदला राज्यासह मुरूड शहर व ग्रामीण भागात कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. मुरूड शहरात सकाळ पासुनच नेहमीप्रमाणे सुरू होते. या बंदला मुरुडकर नागरिकांनी अजीबात प्रतिसाद दिलेला नाही.
रस्त्यावर विक्रम रिक्षा, ऑटो रिक्षा, एसटी बसेस नेहमीप्रमाणे सुरू असुन पंचक्रोशीभागातून खरेदी करण्याकरिता नागरिकांची रोजच्याप्रमाणे गर्दी आणि वर्दळ पाहायला मिळाला. या ठिकाणी बाजारपेठेतील सर्वच दुकाने, भाजी मार्केट, मच्छी मार्केट, शासकीय कार्यालय, शाळा नेहमीप्रमाणे सुरू होते. कोणताही राजकीय पक्ष या बंदसाठी रस्त्यावर उतरला नाही. कोणतेही आव्हान करण्यात आले नाही. कोणीही पुढाकार न घेतल्यामुळे हा बंद यशस्वी होऊ शकलेला नाही.
शाळा बँक नगरपरिषद पंचायत समिती तहसील कार्यालय व सर्व ग्रामपंचायत कार्यालये नेहमीप्रमाणे सुरू होती. त्यामुळे जनजीवन नेहमीप्रमाणेच सुरू असल्याचे निदर्शनास आले. एसटी वाहतूक, विक्रम रिक्षा वाहतूक सुरू असल्याने या ठिकाणी कोणतीही समस्या उद्भवली नाही. कायद्याचे उल्लंघन होवु नये याकरिता शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.