Breaking News

कृषी कायद्यांतील सुधारणांमुळे शेतकर्‍यांना नवे पर्याय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
कृषी कायद्यांतील सुधारणांनंतर शेतकर्‍यांना नवे बाजार मिळतील, पर्याय उपलब्ध होतील, तंत्रज्ञानाची मदत मिळेल. देशातील कोल्ड स्टोरेजच्या सुविधांमध्येही आधुनिकीकरण होईल. यामुळे सर्वाधिक गुंतवणूक ही कृषी क्षेत्रात होईल. याचा सर्वाधिक फायदा आपल्या शेतकर्‍यांनाच होणार आहे, असा दावा पंतप्रधान मोदी यांनी केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एफआयसीसीआयच्या 93व्या वार्षिक बैठकीचे शनिवारी (दि. 12)
व्हर्च्युअल पद्धतीने उद्घाटन करण्यात आले. त्या वेळी संबोधित करताना त्यांनी कृषी कायद्यांसह अनेक मुद्द्यांवर भाष्य केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या वेळी नव्या कृषी कायद्यांची स्तुती केली. कृषी कायद्यांत करण्यात आलेल्या सुधारणांवर भाष्य करीत त्यांनी या कायद्यांचा शेतकर्‍यांना फायदा होणार असल्याचे म्हटले. कृषी क्षेत्र आणि त्याच्याशी निगडीत अन्य क्षेत्रांमध्ये पायाभूत सुविधा असो, फूड प्रोसेसिंग, साठवण्याची प्रक्रिया, कोल्ड चेन यामध्ये आपण अनेक अडथळे पाहिले. आता यांच्या विकासाच्या आड येणार्‍या सर्व भिंती हटवल्या जात आहेत. सर्व समस्या दूर केल्या जात आहेत, असे मोदी म्हणाले.
शेतीमध्ये जेवढी खासगी क्षेत्राकडून गुंतवणूक झाली पाहिजे होती ती करण्यात आली नाही. खासगी क्षेत्राने कृषी क्षेत्रावर हवे तसे काम केले नाही. कृषी क्षेत्रात ज्या खासगी कंपन्या चांगले काम करीत आहेत त्यांना अधिक चांगले काम करण्याची आवश्यकता आहे असे सांगून, भारतातील बाजारांचे आधुनिकीकरण होत आहे. देशात सर्वत्र सुधारणा करण्यात आल्या आहेत. आज भारतात कॉर्पोरेट टॅक्स हा जगात असलेल्या टॅक्सपेक्षा सर्वांत कमी आहे. देश आज प्रगतिपथावर आहे. जेव्हा एक क्षेत्र विकसित होते तेव्हा त्याचा इतर क्षेत्रांवरही सकारात्मक परिणाम होत असल्याचे पंतप्रधान मोदींनी अधोरेखित केले.
2020ने सर्वांवर मात केली
आपण 20-20 सामन्यांमध्ये तेजीने सर्वकाही बदलताना पाहतो, परंतु 2020 या वर्षाने सर्वांवरच मात केली आहे. या काळात आपल्या देशाने आणि संपूर्ण जगाने जे चढ-उतार पाहिले ते काही वर्षांनी आपण आठवले तरी आपल्याला विश्वास ठेवणे कठीण होईल. ज्या गतीने परिस्थिती बिघडली त्याच गतीने ती सुधारतही आहे. कोरोना महासाथीदरम्यान भारताने आपल्या नागरिकांच्या आरोग्याला प्राधान्य दिले. अनेकांचे जीव आपण वाचवले. आज त्याचा परिणाम संपूर्ण देश आणि जग पाहत आहे, असे या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवर्जून सांगितले.

Check Also

पनवेलमध्ये शेकाप कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल ः रामप्रहर वृत्त आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पनवेल तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाला गळती लागली …

Leave a Reply