Sunday , September 24 2023

वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल सभेत ‘छोटा पाकिस्तानचा’ उल्लेख

सोलापूर ः प्रतिनिधी

अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर हे सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. या परिसरात त्यांच्या प्रचार सभा सुरू आहेत, मात्र दोन दिवसांपूर्वी सोलापूर येथे झालेल्या एका प्रचारसभेत अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यासमोर त्यांच्या समर्थकाची जीभ घसरली. सोलापूर येथील नई जिंदगी हा परिसर मुस्लीमबहुल भाग आहे. अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचे समर्थक माजी उपमहापौर प्रमोद गायकवाड यांनी भरसभेत त्या परिसराला ‘छोटा पाकिस्तान’ असे संबोधले. गायकवाड जेव्हा हे वक्तव्य करत होते, त्या वेळी मंचावर अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर हेही उपस्थित होते. परंतु, गायकवाड यांना कोणीच रोखले नाही. एवढेच नाही तर कॉँग्रेस आणि भाजपाच्या उमेदवारांबद्दलही त्यांची जीभ घसरली.

दरम्यान, आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी प्रमोद गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे व भाजपाचे डॉ. जयसिद्धेश्वर महाराज हे त्यांचे प्रमुख प्रतिस्पर्धी आहेत. प्रमोद गायकवाड यांनी ‘छोटा पाकिस्तान’ असा उल्लेख केल्यानंतर सभेसाठी आलेल्या लोकांनीही जल्लोष केला होता. या प्रकरणी निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाचे अधिकारी अजयकुमार बचुटे यांनी एमआयडीसी पोलिसांत फिर्याद दिली. याच सभेत बोलताना अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसवर टीका केली. आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी प्रमोद गायकवाड यांच्यासह सभेसाठी आयोजक म्हणून परवानगी घेतलेले अर्जदार श्रीशैल गायकवाड यांनी अटी व शर्थीचा भंग केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्धही तक्रार नोंदविण्यात आली आहे.

Check Also

महाडच्या गोमुखी आळीतील शतकोत्तर दशकपूर्ती गणेशोत्सव

महाड ः रामप्रहर वृत्त ऐतिहासिक व सामाजिक क्रांतीचे ठिकाण म्हणून शिवकाळापासून नोंद झालेल्या महाड शहरातील …

Leave a Reply