नांदेड : प्रतिनिधी
काय अवस्था आहे त्या राज आणि त्यांच्या मनेसेची. मनसे आधी महाराष्ट्र नवनिर्माण सेना होती. त्यानंतर महाराष्ट्रात मतदार नसलेली सेना झाली. आता तर उनसे म्हणजे उमेदवार नसलेली सेना झाली आहे. लग्न दुसर्याचं आणि हे नाचून राहिले आहेत. रताळ्याला म्हणतात केळं आणि दुसर्याच्या लग्नात नाचतंय खुळं, अशी अवस्था राज ठाकरे यांची झाली आहे, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर निशाणा साधला. ते शनिवारी (दि. 13) भोकर येथील सभेत बोलत होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी नांदेडमध्ये टीका केली होती. त्यावर मुख्यमंत्र्यांनी नांदेडच्या भोकरमधील सभेत राज यांच्या टीकेला उत्तर दिले. राज ठाकरे यांना निवडणूक लढवायची नाही. त्यामुळे ते काहीही बोलत आहेत. त्यांना कुणाला काही पुरावाच द्यायचा नाही. त्यांनी माझ्यावर बसवलेले मुख्यमंत्री असल्याची टीका केली, मात्र मला जनतेने मुख्यमंत्रीपदावर बसवले. तुम्हाला मात्र घरी बसवले. तुमचा सुपडा साफ केला, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी राज यांचा समाचार घेतला.
महाराष्ट्राचे पाणी गुजरातला देण्याचा आरोप राज ठाकरे माझ्यावर करीत आहेत, मात्र यासंदर्भातला करार आघाडी सरकारच्या काळात अशोक चव्हाणांनी केला होता आणि मी तो रद्द केला, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या वेळी त्यांनी, चव्हाणांनी प्रचारासाठी मंच भाड्याने आणला, काल नेता भाड्याने आणला. नवीन पॅटर्न तयार केलाय यांनी समर्थन मिळवण्यासाठी, असे म्हणत अशोकरावांची फिरकी घेतली.