पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महानगरपालिका हद्दीतील आधार कार्ड केंद्र पुन्हा नव्याने सुरू करण्यात यावे, अशी मागणी भाजप नगरसेविका दर्शना भोईर यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी पनवेल महानगरपालिका आयुक्तांना निवेदन दिले आहे. नगरसेविका भोईर यांनी दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे की, पनवेल महानगरपालिका हद्दीतील आधार कार्ड केंद्र मागील काही दिवसांपासून बंद असल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. तसेच पनवेल महानगरपालिका हद्दीत नव्याने वास्तव्यास येणार्या नागरिकांना आधार कार्डवरील पत्ता बदलणे, भ्रमणध्वनी क्रमांक बदलणे, जन्मतारीख बदलणे इत्यादी कामे करण्यासाठी सध्या सुरू असलेल्या असलेल्या आधारकार्ड केंद्रांवर जास्त प्रमाणात गर्दी होत असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे पनवेल महानगरपालिका हद्दीतील नागरिकांची आधारकार्डच्या अनुषंगाने होत असलेली गैरसोय कमी करण्यासाठी आधार कार्ड केंद्र पुन्हा नव्याने सुरू करणे अत्यंत आवश्यक आहे. यापार्श्वभूमीवर पनवेल महानगरपालिका हद्दीतील आधारकार्ड नव्याने सुरू करुन नागरिकांना दिलासा द्यावा.