पनवेल : वार्ताहर
खारघर भागात पाणीपुरवठा केल्या जाणार्या सिडकोच्या पाइपलाइनला अनधिकृतरीत्या जोडणी करून तसेच महावितरणची वीज चोरी करून त्या माध्यमातून सिडकोच्या मोकळ्या जागेवर बेकायदेशीररीत्या वाहनांचे सर्व्हिस सेंटर सुरू करणार्या चौकडीवर खारघर पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यापैकी एकाला अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी पंप मशिन, वॅक्युम मशिन, ब्लोअर मशिन व इतर साहित्य जप्त केले आहे. तसेच गुन्ह्यात सहभागी असलेल्या इतर तीन आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. खारघर सेक्टर-23 मधील जयकुमार सर्कलजवळच्या मोकळ्या जागेमध्ये काही व्यक्तींकडून सिडकोच्या पाइपलाइनला अनधिकृतरीत्या जोडणी करून त्यातून पाण्याची चोरी करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या प्रकाराची वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांनी गंभीर दखल घेऊन तत्काळ या ठिकाणी कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीष कोल्हटकर व त्यांच्या पथकाने सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली असता आदिल उमरमिया पटेल, पापाभाई पटेल, चांद हुसैन सैयद आणि बंगाली या चौघांनी सिडकोकडून पाणीपुरवठा केल्या जाणार्या अंडरग्राऊंड पाइपलाइनला छिद्र पाडून त्याला अनधिकृतरीत्या पाइपची जोडणी केल्याचे आढळून आले. तसेच जवळच असलेल्या महावितरणच्या डीपीमधून वीज चोरी करून त्याद्वारे सिडकोच्या पाइपलाइनमधील पाण्याचा वापर करून वाहने धुवून काढण्यासाठी बेकायदेशीररीत्या सर्व्हिस सेंटर सुरू केल्याचे आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी या चौघांवर पाणीचोरी त्याचप्रमाणे वीजचोरीप्रकरणी गुन्हा दाखल करून त्यातील आदिल उमरमिया पटेल (22) याला अटक केली आहे. दरम्यान, या कारवाईमध्ये पोलिसांनी या ठिकाणावरून पाणीचोरी करण्यासाठी लागणारे पंप मशिन, वॅक्युम मशिन, ब्लोअर मशिन व इतर साहित्य जप्त केले आहे. या चौघांनी हे सर्व्हिस सेंटर कधीपासून सुरू केले याबाबत पोलिसांकडून अधिक तपास करण्यात येत आहे.