Tuesday , March 21 2023
Breaking News

बेंगळुरूचा सलग चौथा पराभव

जयपूर : वृत्तसंस्था

आयपीएलच्या यंदाच्या मोसमात गुणतक्त्यात सर्वात शेवटी असलेल्या राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या दोन संघांमध्ये झालेला आजचा सामना राजस्थानने जिंकला, तर विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला आयपीएलच्या रणांगणात सलग चौथ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. राजस्थान रॉयल्सने बंगळुरूचा सात विकेट्सनी धुव्वा उडवून, चौथ्या सामन्यात आपला पहिला विजय साजरा केला.

आजच्या सामन्यात बंगळुरूने दिलेले 159 धावांचे आव्हान राजस्थानने सात विकेट्स आणि एक चेंडू राखून पूर्ण केले. राजस्थानच्या विजयात जॉस बटलरने 43 चेंडूत 59 धावांची खेळी करून निर्णायक भूमिका बजावली. त्याला राहुल त्रिपाठीने (23 चेंडूत 34 धावा) चांगली साथ दिली. राजस्थानचा कर्णधार अजिंक्य रहाणे (20 चेंडूत 22 धावा) पुन्हा एकदा अपयशी ठरला, तर बंगळुरूकडून यजुवेंद्र चहलने 4 षटकांत 17 धावा देत 2 गडी बाद केले.

तत्पूर्वी बंगळुरूकडून पार्थिव पटेलने सलामीला येऊन 67 धावांची खेळी करत बंगळुरूला 20 षटकांत चार बाद 158 धावांची मजल मारून दिली होती. पार्थिव व्यतिरिक्त बंगळुरूच्या कोणत्याही फलंदाजाला मोठी खेळी साकारता आली नाही. कर्णधार कोहली 25 चेंडूत 23 धावा करून बाद झाला. विराट आज खूप तणावात खेळत असल्याचे पाहायला मिळाले. अखेरच्या षटकात मॉर्कस स्टॉनिसने सावधपणे फलंदाजी करत 28 चेंडूत 31 धावा करून बंगळुरूला 150 धावांचा टप्पा पार करून दिला. राजस्थानकडून श्रेयस गोपालने चांगली गोलंदाजी केली. गोपालने 4 षटकात केवळ 12 धावा देत 3 बळी घेतले.

Check Also

शासकीय कर्मचार्‍यांचा संप अखेर मागे!

सरकासोबत चर्चा यशस्वी मुंबई : प्रतिनिधी गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेला शासकीय, निमशासकीय कर्मचार्‍यांचा संप …

Leave a Reply