भाजपच्या रविनाथ पाटील यांचे पोलिसांना निवेदन
पनवेल : रामप्रहर वृत्त
कळंबोली मार्बल मार्केट व या ठिकाणी असलेल्या पेट्रोल पंपाच्या परिसरात तृतीयपंथी हे देहव्यापार करीत आहे. त्यामुळे या परिसरातील रहिवाशांना त्रास होत असून महिलांना वावरणेही मुश्कील झाले आहे. त्यामुळे देहव्यापार करणार्या या तृतीयपंथीयांवर कारवाई करावी; अन्यथा तीव्र रोशाला सामोरे जावे लागेल, असा इशारा भाजपचे कळंबोली शहर अध्यक्ष रविनाथ पाटील यांनी दिला आहे.
तळोजा बायपास रोड लागत असलेल्या पेट्रोल पंपाच्या आजूबाजूच्या परिसरात तृतीयपंथीयांनी हैदोस माजवला असून, देह व्यापार खुले आम सुरू आहेत. त्यामुळे या परिसरात लुटमारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे, तसेच ये-जा करणार्या महिलांवरही या ठिकाणी उभे असलेले ग्राहक वाईट नजरेने बघत आहे. त्यामुळे महिलांना वावरण्यासही त्रास होत आहे. तसेच रात्रीच्या वेळी हा परिसर धोकादायक बनत असून कोणतीही मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे.
या विरोधात भाजपने आवाज उठवला असून, देह व्यापार करणार्या तृतीयपंथीयांवर कारवाई करून त्यांना तेथून हटवण्याच्या मागणीचे निवेदन कळंबोली भाजपचे शहर अध्यक्ष रविनाथ पाटील यांनी कळंबोली शहर पोलीस ठाण्याच्या सहाय्यक निरीक्षकांना दिले आहे. तसेच कारवाई न झाल्यास भाजप महिला मोर्चा पुढाकार घेऊन त्यांना तथून हटवेल, असा इशारा दिला आहे.