पनवेल ः रामप्रहर वृत्त
तालुक्यातील पाले बुदु्रक ग्रामपंचायत हद्दीतील फणसवाडी येथे लोकसहभागातून उभारण्यात आलेली पाण्याची टाकी काही समाजकंटकांनी सोमवारी (दि. 21) रात्री फोडली. या घटनेमुळे येथील ग्रामस्थांच्या पाण्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या घटनेचा भाजपचे ज्येष्ठ नेते योगेश तांडेल यांनी आढावा घेत याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. फणसवाडी येथील ग्रामस्थांना पाण्याचा प्रश्न भेडसावत होता. त्यामुळे त्यांनी लोकसहभागातून वर्गणी गोळा करून पाच हजार लिटरची पाण्याची टाकी बसवली होती. यातून त्यांचा पाण्याचा प्रश्न मिटला होता, परंतु काही समाजकंटकांनी ही टाकी सोमवारी रात्री फोडली. यामुळे ग्रामस्थांसमोर पाण्याचा प्रश्न पुन्हा निर्माण झाला असून, या घटनेमुळे तीव्र नाराजी पसरली आहे. या संदर्भात भाजपच्या पदाधिकार्यांनी पाहणी करून निषेध व्यक्त केला. या वेळी शक्ती केंद्रप्रमुख दीपक उलवेकर, नरेश भगत, संजय भगत, कमला भगत, शिवदास पवार, बबन भगत, संजय पारधी, जोमा पारधी, लहू पारधी, गणा भगत, धर्मा पारधी, कमळाकर पारधी आदी उपस्थित होते.
गावातील पाण्याच्या टाकीची समाजकंटकांनी तोडफोड केली. आमदार प्रशांत ठाकूर यांनी गावासाठी भरीव काम केले आहे. काही लोक असे कृत्य करून दहशतीचे राजकारण करीत आहेत.
-योगेश तांडेल, ग्रामस्थ
ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून उभारलेल्या पाण्याच्या टाकीची शेकापच्या काही कार्यकर्त्यांनी नासधूस केली. अशा लोकांनी पाण्यासारख्या जीवनावश्यक गोष्टीचे राजकारण करू नये.
-दीपक उलवेकर, ग्रामस्थ