Breaking News

गणेश उत्सव साधेपणाने करण्याचे पनवेल महापालिकेचे आवाहन

पनवेल : प्रतिनिधी

कोविड-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता यावर्षी गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्याचे आवाहन पनवेल महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. सार्वजनिक गणेशोत्सवासाठी गणेशोत्सव मंडळांनी महापालिका/स्थानिक प्रशासन यांची त्यांचे धोरणानुसार यथोचित पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील.

घरगुती तसेच सार्वजनिक गणपतींची सजावट करतांना त्यात भपकेबाजी नसावी. श्री. गणेशाची मुर्ती सार्वजनिक मंडळांकरिता चार फूट व घरगुती गणपतीसाठी दोन फूटांच्या मर्यादेत असावी. या वर्षी शक्यतो पारंपारिक गणेशमुर्तीऐवजी घरातील धातू/ संगमरवर आदी मुर्तीचे पूजन करावे. मुर्ती शाडूची/पर्यावरणपूरक असल्यास त्याचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे. विसर्जन घरी करणे शक्य नसल्यास नजिकच्या कृत्रीम विसर्जन स्थळी विसर्जन करण्यात यावे. उत्सवाकरिता वर्गणी अथवा देणगी स्वेच्छेने दिल्यास त्याचा स्वीकार करावा. जाहिरातींच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही असे पहावे. तसेच आरोग्य विषयक व सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यास पसंती देण्यात यावी.सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्य विषयक उपक्रम अथवा शिबीरे (उदा. रक्तदान) आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याव्दारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू इत्यादी आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वचछता यांबाबत जनजागृती करण्यात यावी.

आरती, भजन, किर्तन वा अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करतांना गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच ध्वनी प्रदुषणासंदर्भातील नियमांचे व तरतूदींचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. श्रीगणेशाचे दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुक इत्यादीव्दारे उपलब्ध करून देण्याबाबत जास्तीत जास्त व्यवस्था करण्यात यावी. गणपती मंडपांमध्ये निर्जंतुकीकरणाची तसेच थर्मल स्क्रीनिंगची पर्याप्त व्यवस्था करण्यात यावी. प्रत्यक्ष येऊन दर्शन घेऊ इच्छिणार्‍या भाविकांसाठी सोशल डिस्टन्सिंग तसेच स्वच्छतेचे नियम (मास्क, सॅनीटायझर इत्यादी) पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे.

श्रींच्या आगमन व विसर्जन मिरवणूका काढण्यात येऊ नयेत. विसर्जनाच्या पारंपारिक पध्दतीने विसर्जन स्थळी होणारी आरती घरीच करून विसर्जन स्थळी कमीत कमी वेळ थांबावे. लहान मुले आणि वरिष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जनस्थळी जाणे टाळावे. इमारतीतील सर्व घरगुती गणेशमुर्तींच्या विसर्जनाची मिरवणूक एकत्रितरित्या काढण्यात येऊ नयेत.

कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय, शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष सण सुरू होण्याच्या मधल्या कालावधीत अजून काही सुचना प्रसिध्द झाल्यास त्यांचेदेखील अनुपालन करावे.

या नियमांचे पालन न व्यक्ती, संस्था, सार्वजनिक मंडळांविरूध्द यथास्थिती आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 मधील कलम 51 ते 60, साथरोग नियंत्रण अधिनियम, 1897 व भारतीय दंड संहिता, 1860 मधील कलम 188 नुसार दंडनीय, कायदेशिर कारवाई करण्यात येईल. परिपत्रकाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी अशा सूचना पनवेल महापालिकेने गणोत्सव मंडळांना दिल्या आहेत.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply