Breaking News

नेरळ-कळंब एसटी सुरू करण्याची विद्यार्थ्यांची मागणी

कर्जत : बातमीदार

कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने शासनाने निर्बंध शिथिल केले आहेत. त्यामुळे कर्जत तालुक्यातील नेरळ-कळंब-वारे आणि ओलमण मार्गावर एसटी सेवा सुरू करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

कर्जत तालुक्यातील कळंब भागातील विद्यार्थ्यांना  शिक्षणासाठी नेरळ तसेच पोशीर येथे जावे लागते. निर्बंध शिथिल झाल्याने आठवी-नववी ते बारावीपर्यंत शाळा कॉलेज सुरू केले आहेत. एसटी बस सेवा बंद असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना खाजगी वाहनावर अवलंबून राहावे लागत आहे. त्याचे प्रवास भाडे परवडत नसल्याने काही पालक आपल्या पाल्यास शाळा, कॉलेजमध्ये पाठवत नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.तसेच या भागातील आदिवासी भाजीपाला शेती करून  कुटुंबाची उपजीविका करीत असतात. एसटी सेवा बंद असल्याने त्यांना बाजाराच्या ठिकाणी भाजीपाला नेता येत नाही. त्यांचेही मोठे आर्थिक नुकसान होत आहे.

कोरोनामुळे आधीच आर्थिक स्थिती बिकट आहे, त्यात सर्वांना परवडणारी एसटी बंद आहे. कर्जत एसटी आगारातून आणि नेरळ एसटी स्थानकातून ग्रामिण भागात गाड्या सोडण्यात याव्यात.

-शाहेजाद लोगडे, रहिवासी, कळंब, ता. कर्जत

एसटीची बससेवा बंद असल्याने खाजगी प्रवासी वाहतूक करणार्‍यांचे फावले आहे. ते कळंब ते नेरळ या 12 किलोमीटर अंतरासाठी प्रति प्रवासी 30 ते 40 रुपये घेतात.  विद्यार्थ्यांनाही त्याचा फटका बसत आहे. त्यामुळे एसटी प्रशासनाने किमान सकाळी व सायंकाळी बस फेर्‍या सुरू कराव्यात.

-अकबर खान, तालुका उपाध्यक्ष, मनसे कर्जत

कर्जत आगारातून सध्या मुरबाड, नेरळ, माथेरान या बस सेवा सुरू आहेत. ओलमन बस फेरी सुरू करण्यासाठी प्रवाशांची मागणी असून, दोन दिवसात ग्रामीण भागातील ओलमण-नेरळ बस सेवा सुरू करण्यात येईल.

-शंकर यादव, एसटी आगार प्रमुख, कर्जत

Check Also

पोषण आहारात मृत उंदीर सापडल्याच्या घटनेतील तपासणीचे नमुने नाकारणार्‍या प्रयोगशाळांवर कारवाई करणार

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रश्नावर ना.आदिती तटकरेंचे उत्तर पनवेल : रामप्रहर वृत्ततपासणीसाठी पाठवलेले नमुने नाकारणार्‍या …

Leave a Reply