पंतप्रधान मोदींनी विद्यार्थ्यांना दिला मंत्र
कोलकाता ः वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुरुवारी (दि. 24) पश्चिम बंगालमधील विश्वभारती विद्यापीठाच्या शतकपूर्ती कार्यक्रमात सहभाग घेत गुरूदेव रविंद्रनाथ टागोर यांच्यासह स्वामी विवेकानंदांच्या आठवणींना उजाळा दिला. स्वातंत्र्याच्या लढाईत विश्वभारती विद्यापीठाचे महत्त्वपूर्ण योगदान असून, राष्ट्रवाद आणि देशभक्तीची प्रेरणा याच विद्यापीठातून रूजू झाल्याचे पंतप्रधान मोदींनी म्हटले. या वेळी त्यांनी देशातील तरुणाईला लोकल टू व्होकलसाठी प्रयत्न करून आत्मनिर्भतेचा संदेश दिला.
कोरोना महामारीच्या संकटामुळे यंदा विश्वविद्यालयात यात्रेचे आयोजन करता आले नाही, तरीही येथील विद्यार्थ्यांनी प्रदर्शनात येणार्या लोकांशी संपर्क करावा. त्यातून लोकल कलाकृती ऑनलाइन पद्धतीने कशारितीने विकता येतील यासाठी प्रयत्न करावा. आपले लोकल प्रोडक्ट ग्लोबल बनविण्याचे तुमच्या हाती असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. आपले ध्येय साध्य करण्यासाठी एकट्याने चालावे लागले तरी चालावे. जेव्हा स्वातंत्र्यांची लढाई उंबरठ्यावर होती, तेव्हा बंगालने या चळवळीला दिशा दिली. त्यासोबतच कला आणि संस्कृतीच्या क्षेत्रातही पश्चिम बंगालने मोठे योगदान दिल्याचे पंतप्रधान मोदींनी अधोरेखित केले.
पंतप्रधान आज साधणार शेतकर्यांशी संवाद
नवी दिल्ली : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीच्या औचित्याने देशातील शेतकर्यांना पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी अंतर्गत आर्थिक लाभाचा पुढील हफ्ता शुक्रवारी (दि. 25) मिळणार आहे. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकर्यांशी संवाद साधणार आहेत. पंतप्रधान मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे नऊ कोटींहून अधिक लाभार्थी शेतकरी परिवारांना 18 हजार कोटी रुपयांहून अधिक रकमेचे वाटप करणार आहेत तसेच ते शेतकर्यांशी बोलतील. या वेळी शेतकरीही या योजनेंतर्गत आलेला अनुभव सांगतील. शेतकरी संघटनांनी सरकारचे कायदे समजून घ्यावेत. आम्ही खुल्या मनाने चर्चा करण्यास तयार आहोत, असे केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी म्हटले आहे.