Breaking News

भ्रष्टाचारी तटकरेंना जनता धडा शिकवणार

अनंत गीते यांचे प्रहार; राजपुरीत सभा

मुरूड : प्रतिनिधी : सुनील तटकरे हे 72 हजार कोटी जलसिंचन प्रकरणातले मुख्य संशयित आहेत, तसेच त्यांच्यावर मनी लॉन्डरिंगचा खटला सुद्धा सुरू आहे. बेनामी कंपन्या काढून शेतकर्‍यांच्या जमिनी कावडीमोल किमतीने विकत घेतल्या आहेत. आपल्या सहकार्‍यांना नेहमीच फसविण्याचे काम ज्यांनी केले आहे, अशा भ्रष्टाचारी व विश्वासघातकी व्यक्तीस रायगड लोकसभा मतदारसंघातील जनता कदापि खासदार म्हणून निवडून देणार नाही, तर अशा व्यक्तीला धडा शिकवण्यासाठी मतदार 23 एप्रिलची वाट पाहत असल्याचे प्रतिपादन महायुतीचे उमेदवार अनंत गीते यांनी राजपुरी येथे जाहीर सभेत केले आहे.

मुरूड तालुक्यातील राजपुरी येथे शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. त्यात अनंत गीते बोलत होते. बलशाली भारत बनवायचा असेल, तर देशाचे नेतृत्व हे नरेंद मोदींकडे असणे खूप आवश्यक असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.

आपल्या राज्यात सिंचन घोटाळा घडल्यामुळे शेकडो शेतकर्‍यांना आत्महत्या करावी लागली आहे. हाच पैसा सिंचनात वापरला गेला असता, तर पुष्कळ क्षेत्र ओलिताखाली येऊन शेतकरी सुजलाम सुफलाम झाला असता. ज्यांनी जलसिंचनात भ्रष्टाचार केला आहे, त्यांना शेतकरी कुटुंबांचे शाप भोवल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास गीते यांनी व्यक्त केला.

रायगड जिल्ह्यात येणारे प्रकल्प घालवण्याचे काम येथील शेकाप करीत आहे. आपल्या मनाप्रमाणे घडले नाही की, लोकांना भडकवून प्रकल्प हिसकावण्याचे काम शेकापवाले करीत आहेत, अशी टीका भाजपचे अलिबाग-मुरूड विधानसभा अध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांनी केली. सुनील तटकरे 11 वर्षे या रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री होते, त्या वेळी काय दिवे लावले व कोणता विधायक विकास केलात हे त्यांनी जनतेला सांगावे. माजी आमदार मधुशेठ ठाकूर यांचा पाठिंबा मिळवण्यासाठी तटकरे यांनी कोणती क्लृप्ती वापरली याचा जनतेला खुलासा करावा, असे आव्हानही अ‍ॅड. मोहिते यांनी यावेळी दिले.

आमच्या महायुतीचे उमेदवार खासदार अनंत गीते यांचे स्वच्छ चारित्र्य आहे. मंत्री पदाच्या कालावधीत त्यांच्यावर एकसुद्धा आरोप झालेला नाही. याउलट तटकरे यांची मंत्रिपदाची कारकीर्द वादग्रस्त ठरली आहे. निवडणुकीत उभे करून, पाठीत खंजीर खुपसणार्‍या तटकरे यांना या निवडणुकीत पराभूत केल्याशिवाय महायुतीचे कार्यकर्ते स्वस्थ बसणार नाहीत, असे अ‍ॅड. महेश मोहिते यांनी या वेळी सांगितले. शिवसेना, भाजप महायुतीचे उमेदवार अनंत गीते यांचा या वेळी भाजपचे ज्येष्ठ नेते नरहरी गीदी यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. रायगड जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे, नगराध्यक्ष स्नेहा पाटील, उपनगराध्यक्ष नौशीन दरोगे, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख महेंद्र दळवी, भाजपचे तालुका अध्यक्ष जयवंत अंबाजी, ऋषिकांत डोंगरीकर, विजुभाऊ कवळे, प्रशांत मिसाळ, गणेश मोंनाक, महेंद्र चौलकर, प्रमोद भायदे, अशील ठाकूर, महेश मानकर आदी पदाधिकार्‍यांसह युतीचे कार्यकर्ते आणि मतदार या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply