Breaking News

कोरोनाची रात्रपाळी!

राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या गोंधळयुक्त निर्णयांची एव्हाना जनतेला चांगलीच सवय झाली आहे. कुठल्याही समस्येचा सर्वंकष विचार न करता निर्णय जाहीर करायचे, त्या निर्णयांचा फोलपणा लक्षात आणून दिला गेल्यावर काही तरी जोड निर्णय घेऊन सारवासारव करायची हे तर गेले वर्षभर सुरूच आहे. त्याच मालिकेतला ताजा निर्णय म्हणून रात्रीच्या संचारबंदीच्या निर्णयाचा उल्लेख करावा लागेल.

एकीकडे देशात आणि राज्यातही कोरोनासंबंधी आकडेवारीत घसरण दिसून आल्यानंतर जनजीवनातील नित्याच्या व्यवहारांनी उचल घेतली आहे. यातूनच अर्थव्यवस्थेचे गाडे हळूहळू पूर्वपदावर येईल अशी आशा आहे. देशातील वातावरण असे सकारात्मकरित्या बदलू लागलेले असतानाच ब्रिटनमध्ये कोरोना विषाणू एका नव्या, अधिक वेगाने पसरणार्‍या रूपात आढळून आल्याचे वृत्त आले. ही बातमी आणि समोर येऊन ठाकलेला नाताळ, थर्टी फर्स्टचा काळ, या दोन्ही बाबी विचारात घेऊन राज्यातील आघाडी सरकारने तातडीने या काळात रात्रीच्या संचारबंदीची घोषणा करून टाकली. प्रारंभी ही घोषणा महापालिका क्षेत्रांपुरतीच मर्यादित होती आणि तिथेच संबंधितांनी परिस्थितीचा साकल्याने विचारच केलेला नाही हे उघड झाले. जवळपास संपूर्ण 2020 साल घरात कोंडल्याअवस्थेत काढलेल्या कित्येकांनी परिस्थिती सुधारते आहे हे लक्षात घेऊन नाताळच्या सुटीपासूनची वर्षअखेर घरापासून दूर हॉटेल-रिझॉर्टमध्ये साजरी करण्याचे बेत आखले आहेत. लोणावळा, महाबळेश्वर असो की रायगड जिल्ह्यातील पर्यटनस्थळे सगळीकडेच पर्यटकांची रेलचेल वाढू लागली आहे. वर्षभर उत्पन्नापासून दूर राहिलेले पर्यटन आणि हॉटेल क्षेत्र या कालखंडाकडे कमाईच्या दृष्टीने मोठ्या आशेने पाहाते आहे. कित्येक सर्वसामान्यांची उपजीविकाही या क्षेत्रांशी जोडलेली आहे. वर्षभर ससेहोलपट सोसलेल्या या सार्‍यांच्या हाती आता तरी काही कमाई लागण्याची शक्यता आहे. असे असताना राज्य सरकारने केलेली रात्रीच्या संचारबंदीची घोषणा अनेक अर्थांनी अनाकलनीय वाटते. कोरोनाचे संकट अद्याप पुरते टळलेले नाही. त्यात ब्रिटनमधील कोरोनाचा नवा विषाणू, त्याचे स्वरूप तर अद्याप पुरते समजायचे आहे. त्यामुळे खबरदारी घेतलीच पाहिजे. परंतु सुयोग्य खबरदारीचा आणि रात्रीच्या संचारबंदीचा संबंध काय? नाताळच्या काळात वा थर्टी फर्स्टला घराबाहेर पडून रात्रीच्या पार्ट्या करणारे लोक विशिष्ट वर्गापुरते मर्यादित आहेत. महामारीच्या काळात त्यांची संख्या यंदा आणखी कमी होईल. आपल्याकडे कोरोनासंबंधी परिस्थिती सुधारली आहे. हा बदल तसाच कायम राखायचा असेल तर निव्वळ रात्रीच नव्हे तर दिवसाही खबरदारी घ्यायला हवी आहे. मास्कच्या बाबतीत पोलिसांमार्फत कठोर अंमलबजावणी सुरू असली तरी सर्वसामान्यांमध्ये आता मास्कची गरज नाही ही भावना बळावते आहे. हा गैरसमज दूर करण्यासाठी जागरुकता मोहिमेची गरज आहे. सामाजिक अंतर राखण्याची जाणीव मुळातच फारशी रुजली नव्हती. आता तर ते लोकांच्या ध्यानीमनीही दिसत नाही. हात धुण्याची,  सॅनिटायझर वापरण्याची सवयही वेगाने मागे पडते आहे. पर्यटन क्षेत्र असो वा कुठलाही सर्वसामान्य भाग, लसीकरण व्यापकरित्या राबविले जातानाही  लोकांना या नियमांचे पालन सुरूच ठेवायला भाग पाडायचे आहे. असे असताना निव्वळ रात्रीच्या संचारबंदीची फसवी घोषणा कशासाठी? त्यातून काही गरजूंची गैरसोय होण्यापलीकडे काय साधले जाणार? समस्यांविषयी सर्वंकष विचार करून निर्णय घेतले गेले तर त्यावर असे प्रश्न उपस्थित होणार नाहीत हे आघाडी सरकारने आतातरी लक्षात घ्यावे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply