पनवेल : प्रतिनिधी
नवीन पनवेलमधील सिध्दीविनायक सोसायटीला अनेक वर्षांनी ना हरकत दाखला मिळाल्याने त्यांना पाण्याचे कनेक्शन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे तेथील रहिवाश्यांनी आमदार प्रशांत ठाकूर आणि स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी यांचे गुरुवारी (दि. 24) आभार मानले. नवीन पनवेल सेक्टर 6 मध्ये सिध्दी विनायक सोसायटी विकासक राजेंद्र कालेकर यांनी 2015 मध्ये पूर्ण करून सोसायटीला महापालिकेचा ना हरकत दाखला मिळाला नसताना लवकरच तो मिळेल असे सांगून त्याचा ताबा रहिवाश्यांना दिला. ना हरकत दाखला नसल्याने सोसायटीला महापालिकेचे पाण्याचे कनेक्शन मिळाले नव्हते. त्यामुळे पिण्यासाठी पॅक पाण्याच्या बाटल्या विकत घ्याव्या लागत होत्या. बोरिंगचे पाणी इतर कामासाठी वापरले जात होते. ना हरकत दाखला मिळाल्याने आता महापालिकेचे पाणी मिळणार असल्याने पाणी विकत घ्यावे लागणार नाही. पाच वर्षांनी आता पाण्याच्या बाटल्या विकत घ्याव्या लागणार नाही. तसेच या कोरोनाच्या काळात पैसे वाचणार असल्याने येथील रहिवाशी श्रीनिवास अय्यर, संकेत जाधव, किरण जैन, कुमार जाधव आणि कृष्णा दबडे यांनी आमदार प्रशांत ठाकूर आणि स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी यांच्याकडे ना हरकत दाखला मिळण्यासाठी विनंती केली. सिध्दी विनायक सोसायटीला पाच वर्षांनी अखेर डिसेंबर 2020 मध्ये ना हरकत दाखला मिळाल्याने त्यांनी गुरुवारी आमदार प्रशांत ठाकूर आणि स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी यांचे आभार मानले.