पुन्हा कोविडच्या साथीचा फैलाव होऊ नये यासाठी एकीकडे आटापिटा सुरू असतानाच राज्यात ठिकठिकाणी उसळलेली पर्यटकांची गर्दी मास्क, सोशल डिस्टन्सिंग यांसारखी मूलभूत खबरदारीही घेताना दिसत नाही. इतके महिने घरात बंदिस्त राहिलेले लोक मोकळेपणाने हिंडू-फिरू इच्छितात यात वावगे काहीच नाही. परंतु कोरोनाचे संकट अद्याप पूर्णपणे टळलेले नाही याचे भानही त्यांनी बाळगायलाच हवे आहे. हा बेजबाबदारपणा तथाकथित सुशिक्षितपणाच्या व आर्थिक स्तरांच्या सर्व सीमारेषा ओलांडून सर्वत्र दिसतो ही मोठी खेदाची बाब आहे.
महाराष्ट्रातील कित्येक पर्यटनस्थळांच्या परिसरात हॉटेल बुकिंगमध्ये जोरदार वाढ झाल्याचे पर्यटनविषयक वेबसाइट्स तसेच ट्रॅव्हल कंपन्यांकडून सांगितले जात आहे. कित्येक ठिकाणी मागील वर्षीच्या ख्रिसमस सप्ताहापेक्षा यंदा अधिक मागणी दिसते आहे. कोरोना विषाणूचा फैलाव देशात सुरू झाल्यापासून दुर्दैवाने महाराष्ट्र रुग्णसंख्येच्या बाबतीत सातत्याने आघाडीवर राहिला. देशभरातील परिस्थिती बर्यापैकी आटोक्यात आल्यावर देखील दीर्घ काळ महाराष्ट्रातील जनता लॉकडाऊन सदृश परिस्थितीच अनुभवत राहिली. विशेषत: मुंबई, पुणे आणि अन्य महानगरांना याची झळ अधिक बसली. साहजिकच डिसेंबर अखेरीस राज्यात कोरोना संदर्भातील आकडेवारीत लक्षणीय घसरण झाल्याचे समोर येताच, जवळपास वर्षभर वर्क फ्रॉम होम करीत घरातच डांबून घेतल्यासारखे राहिलेल्या उच्चभ्रू नोकरदार मंडळींनी तातडीने शहराबाहेर पडण्याचे बेत आखले. ख्रिसमसची 25 तारखेची सुटी शनिवार, रविवारला जोडून आल्याने मुंबई-पुण्याजवळच्या पर्यटनस्थळी लाँग वीकेंड साजरा करायला इतकी गर्दी लोटली की अनेकांना निरनिराळ्या महामार्गावरील कोंडीत अडकावे लागले. अर्थात, अलिबाग, गणपती पुळे येथील समुद्र किनार्यांवरील गर्दी तसेच लोणावळा, महाबळेश्वरमधील वाहतूक कोंडी पाहता अनेकांनी आधीच पर्यटन स्थळे गाठल्याचेही दिसतेच. एकीकडे लोकांच्या या उत्साहामुळे हॉटेल व पर्यटन क्षेत्रामध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे तर दुसरीकडे ब्रिटनमधील नव्या कोरोना विषाणूमुळे ठिकठिकाणच्या प्रशासनांचे धाबे दणाणले आहे. कोरोना महामारीमुळे मार्च अखेरीपासून पर्यटन व हॉटेल क्षेत्राला मोठा फटका बसला. आंतरराष्ट्रीय प्रवास व पर्यटन पूर्ववत सुरू होण्याची तर अजुनही कोणतीच लक्षणे नाहीत. अशात राज्यांतर्गत प्रवासावरील निर्बंध उठवले गेल्याने अनेकांनी हिमाचल प्रदेश, उत्तराखंड येथील निसर्गरम्य ठिकाणी धाव घेतली आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने सत्तर टक्के पर्यटक चार, पाच तारांकित हॉटेलांना पसंती देत आहेत. स्वतंत्र बंगले, होम-स्टे यांची मागणी कधी नव्हे इतकी वाढली आहे. नैराश्याने झाकोळून गेलेल्या पर्यटन क्षेत्रात यामुळे येत्या वर्षाविषयी आशेचे वातावरण निर्माण झाले आहे. ब्रिटनमधून नव्या स्वरुपाच्या कोरोना विषाणूची बातमी आल्याने मात्र परिस्थितीविषयी पुन्हा काहिशी चिंताही जागी झाली आहेच. या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर ब्रिटनहून येणार्या विमानांची वाहतूक थांबविण्यात आली. मात्र, युरोपातील अन्य ठिकाणांहून मोठ्या प्रमाणात प्रवासी मुंबईत येतच आहेत. एकट्या गुरुवारी युरोप आणि मध्य पूर्वेतून 1206 प्रवासी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. यापैकी 788 जणांना शहरात क्वारंटाइन करण्यात आले आहे. ब्रिटनहून येऊन ठाणे, पालघर जिल्ह्यांमध्ये गेलेल्या कित्येकांचा मागोवा त्या-त्या जिल्ह्यांच्या प्रशासनांकडून घेतला जातो आहे. एकीकडे व्यापक कोरोना प्रतिबंधकलसीकरणाची तयारी वेगाने सुरू आहे. असे असताना कोरोना विषाणू विरोधी सावधगिरी सोडून चालणार नाही हे जनतेला पटवून देण्यासाठी प्रभावी मोहिमेची नितांत आवश्यकता आहे.