पनवेल : वार्ताहर – कस्टम विभागाने जप्त केलेल्या कंटेनरमधून कालबाह्य व आरोग्यास हानीकारक असलेल्या चार कोटी 19 लाख 90 हजार 400 रुपयांच्या गुडंग गरन सिगारेटस् स्टिक्स चोरी करणार्या टोळीला न्हावाशेवा पोलिसांकडून जेरबंद करण्यात आले आहे. त्यांच्याकडून एक कोटी 81 लाख 88 हजार 720 रुपयाचा माल हस्तगत केला आहे.
न्हावा शेवा पोलीस ठाण्यात स्पीडी सीएफएस, सोनारी गाव, उरण येथून कस्टम विभागाने जप्त केलेला व सुरक्षिततेकामी स्पीडी सीएफएस येथे ठेवलेल्या सीलबंद कंटेनरमधून एकूण चार कोटी 19 लाख 90 हजार 400 रुपये किमतीच्या गुडंग गरम ड्रडचे 23, 32, 800 सिगारेट्स स्टिक्स चोरून नेल्याबाबत कस्टम विभागाने तक्रार दिल्यावरून गुन्हा नोंद करण्यात आला होता.
चोरीस गेलेला मुद्देमाल हा कस्टम विभागाच्या अखत्यारित असून तो मोठ्या रकमेचा, कालबाह्य व नाशवंत असल्याने तो मानवी आरोग्यास धोकादायक होता. त्यामुळे हा माल लवकरात लवकर हस्तगत करून पाच आरोपींना ताब्यात घेतले आहे.त्यांच्याकडुन एक कोटी 81 लाख 88 हजार 720 रुपयांच्या 9,40,440 सिगारेट स्टीक्स जप्त केल्या आहेत. तसेच गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे. उर्वरित मुद्देमाल हस्तगत करून पाहिजे आरोपींचा शोध सुरू आहे.