वीकेण्ड लॉकडाऊनचा सदुपयोग
कर्जत : प्रतिनिधी
वीकेण्ड लॉकडाऊन आणि रविवार असूनही आज लस उपलब्ध झाल्याने कर्जत उपजिल्हा रुग्णालयात पुन्हा लसीकरण सुरू करण्यात आले. त्यामुळे लस घेण्यासाठी नागरिकांनी सकाळपासूनच रुग्णालयाच्या आवारात गर्दी केली होती. वीकेण्ड लॉकडाऊनच्या दुसर्या दिवसाचा कर्जतमधील नागरिकांनी चांगला उपयोग करून घेतला.
लस उपलब्ध असल्याचा मेसेज येताच कर्जत उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक मनोज बनसोडे यांनी शनिवारी कर्मचारी पाठवून अलिबाग जिल्हा रुग्णालयातून कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन लस आणली. हे नागरिकांना कळताच रविवारी सकाळपासूनच कर्जत उपजिल्हा रुग्णालयात लस घेण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली. रविवारी 230 जणांना लस देण्यात आली.
कर्जत उपजिल्हा रुग्णालयात आत्तापर्यंत आरोग्य कर्मचारी, शिक्षक, पोलीस कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक आणि 45 वर्षांवरील नागरिक अशा 5800 जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.
शनिवारी लस उपलब्ध झाल्यानंतर रविवारी सकाळपासून लसीकरण सुरू करण्यात आले. आज कोविशिल्ड लस देण्यात आली. उद्यापासून कोवॅक्सिन लस देण्यात येणार आहे.
-डॉ. मनोज बनसोडे, वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, कर्जत