पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेलमधील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहातील कर्मचारी संख्या वाढविणे व अंतर्गत देखभालीसंदर्भात भाजप पनवेल शहर मंडल सांस्कृतिक सेलचे संयोजक अभिषेक पटवर्धन यांनी पनवेल महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांना निवेदन दिले आहे. पटवर्धन यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शासनाच्या आदेशानूसार 5 नोव्हेंबरपासून फडके नाट्यगृह चालू करण्यात आले. त्यानंतर पनवेल महानगरपालिकेच्या महासभेमध्ये नाट्यगृहाच्या भाड्यामध्ये 50 टक्के सवलत देण्यात आली. 26 डिसेंबरला फडके नाट्यगृहात भाजप सांस्कृतिक सेल, पनवेल शहर आयोजित पहिला मनोरंजनपर सांस्कृतिक कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळाला. परंतू नाटयगृहाच्या संदर्भातील काही मुद्दे आमच्या लक्षात आले आहेत. नाट्यगृहातील मॅनेजमेंट कर्मचारी, हाऊसकिपिंग तसेच सफाई कर्मचारी आणि सेक्युरिटी गार्ड यांची संख्या लॉकडाऊनच्या काळात कमी करण्यात आली होती. आता अनलॉक सुरू झाले असून नाट्यगृहदेखील सुरू झाले आहेत. तरीही कर्मचारी संख्या ही मात्र अजूनही पूर्ववत झालेली नाही. त्यामुळे कार्यक्रमांमध्ये प्रेक्षकांना त्यांच्या सीटपर्यंत पोहचविणे, तसेच त्यांचे तिकिट चेक करणे ह्यात त्रास झाला. हे कर्मचारी संख्या लवकरात लवकर पूर्ववत करावी जेणेकरून येथे होणार्या कार्यक्रमांच्या संस्थांना त्रास होणार नाही. तसेच नाट्यगृहाच्या देखभालीसंदर्भात पत्रव्यवहार केला होता. त्याबाबतदेखील लवकरात लवकर पावले उचलावीत. या निवेदनाची प्रत माहितीसाठी महापौर डॉ. कविता चौतमोल व सभागृह नेते परेश ठाकूर यांना देण्यात आल्या आहेत.