उरण ः वार्ताहर – यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे उरण तालुक्यात दरवर्षी दत्त जयंतीला भरणारी यात्रा रद्द करण्यात आली आहे. येथे दत्त जयंतीच्या दिवशी दर्शनासाठी भक्तांची तुरळक गर्दी होती. दुपारी 12 वाजता दत्त मंदिराचे पुजारी ओमकार बैरागी यांच्या हस्ते देवाची आरती करण्यात आली. त्यानंतर भक्तांनी सामाजिक अंतर ठेवून दर्शन घेतले.
दरवर्षी उरण तालुक्यात दत्त जयंतीनिमित्त यात्रा भरते. शोभेच्या वस्तू, महिलांसाठी सौंदर्य प्रसाधने, आकाश पाळणे, बच्चे कंपनीसाठी वेगवेगळी खेळणी, मिठाईची दुकाने आदी या वेळी दिसले नाही. फक्त हार, फुले, नारळ आदींची दुकाने मंदिराजवळ थाटण्यात आली होती. ऐश्वर्या प्रोडक्शनचे अध्यक्ष राजेश पाटील यांच्या वतीने सर्व भक्तांना प्रसाद वाटण्यात आला. हा उपक्रम दरवर्षी राबविला जातो.
आमदार महेश बालदी मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षी भक्तांना अन्नदान केले जाते, परंतु यंदा कोरोनाचे सावट असल्याने अन्नदान रद्द करण्यात आले. उरण तालुक्यात बोरी नाका येथील परेश तेरडे यांचे दत्त मंदिर येथेही भक्तांनी सामाजिक अंतर ठेवून दर्शन घेतले.