प्रतिकिलोचे दर 90 ते 100 रुपयांवर
पनवेल : रामप्रहर वृत्त
सध्या उन्हाची काहिली सुरू असल्याने लिंबाची मागणी वाढली आहे. असे असताना आवक 50 टक्के घटल्याने लिंबू महाग झाले आहे. दरात प्रतिकिलो 40 रुपयांची वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात 50 ते 60 रुपये प्रतिकिलो असलेले दर 90 ते 100 रुपयांवर गेले आहेत. उन्हाळ्यात रसवंतीगृहे, सरबतांसह खण्यातही लिंबू जास्त प्रमाणात वापरले जाते. त्यामुळे लिंबांना मोठी मागणी असते, मात्र या वर्षी अवकाळी पावसामुळे लिंबू बागांना जास्त पालवी फुटली नाही, परिणामी उत्पादनात घट झाली. सध्या वाशी घाऊक बाजारात आंध्र प्रदेश येथून 60 टन आवक होत आहे. तेच मागील वर्षी 90 ते 100 टन आवक होत होती. त्या तुलनेत 50 टक्क्यांपर्यंत आवक घटली आहे. त्यात बाजारात लिंबाची मागणी वाढली आहे. त्यामुळे दर गगनाला भिडले आहेत, अशी माहिती घाऊक व्यापार्यांनी दिली आहे. प्रतिकिलोचे दर 90 ते 100 रुपयांवर पोहोचले आहेत. किरकोळ बाजारात लिंबू 5 रुपयांवर गेले आहे. दर आणखी वाढण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे. वाढत्या उष्म्यामुळे शीतपेयाची मागणी वाढली असून किमतीतसुद्धा यंदा वाढ झाली आहे. यात प्रामुख्याने लिंबू शरबत, शिकंजी आणि ताकाच्या किमतीत 5 ते 10 रुपयांची दरवाढ झाली आहे. यामुळे नागरिकांना या गारव्यासाठीसुद्धा अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. पूर्वी 10 रुपयाला असलेले लिंबू सरबत आता 15 रुपयांना मिळत आहे.
या वर्षी पावसामुळे लिंबाच्या उत्पादनाला फटका बसला आहे. त्यामुळे बाजारात आवक निम्म्याने घटली आहे. प्रतिकिलोच्या दरात 50 रुपयांची वाढ झाली असून आतापर्यंतची ही मोठी दरवाढ आहे.
-चंद्रकांत महामूळकर, लिंबू व्यापारी