ब्रिटनमधून परतलेल्या सहा जणांना संसर्ग
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
कोरोनाच्या संसर्गाचा वेग कमी होत असतानाच ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या नव्या विषाणूने डोकेदुखी वाढवली आहे. वेगाने पसरणार्या कोरोनाच्या या नवीन प्रकाराने जगभरात हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. एव्हाना 16 देशांमध्ये पोहचलेल्या या विषाणूने आता भारतातही शिरकाव केला आहे. देशात नव्या प्रकाराचा संसर्ग झालेले सहा रुग्ण आढळून आले आहेत.
ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा प्रकार आढळून आला आहे. या विषाणूला रोखण्यासाठी भारतासह अनेक देशांनी ब्रिटनसोबतची विमानसेवा बंद केली आहे, मात्र तरीही नव्या कोरोनाने भारतात पाऊल ठेवले. 25 नोव्हेंबर ते 23 डिसेंबरदरम्यान ब्रिटनमधून 33 हजार नागरिक भारतात परतले. या सर्व प्रवाशांचा शोध घेण्यात आला आणि चाचण्या करण्यात आल्या. यात 114 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले.
रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याचे नमुने देशातील 10 प्रयोगशाळांमध्ये पाठवण्यात आले होते. यात कोलकाता, भुवनेश्वर, एनआयव्ही पुणे, सीसीएस पुणे, सीसीएमबी हैदराबाद, सीसीएफडी हैदराबाद, इन्स्टेम बंगळुरू, एनआयएमएचएएनएस बंगळुरू, आयजीआयबी दिल्ली आणि एनसीडीसी दिल्ली या प्रयोगशाळांचा समावेश आहे. यात बंगळुरू येथील प्रयोगशाळेत पाठवलेल्या नमुन्यांपैकी तीन रुग्णांमध्ये नवीन स्ट्रेन (नवीन प्रकार) आढळून आला आहे, तर हैदराबाद प्रयोगशाळेतील दोघांच्या शरीरात आणि पुण्यातील प्रयोगशाळेत चाचणी करण्यात आलेल्या नमुन्यांपैकी एकामध्ये हा स्ट्रेन आढळला आहे.
एकूण सहा रुग्णांच्या शरीरात कोरोनाचा नवा विषाणू आढळून आला असून, या सर्व रुग्णांना संबंधित राज्यांनी स्वतंत्र विलगीकरण कक्षात ठेवले आहे, तर त्यांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. त्याचबरोबर अन्य प्रवाशांची माहिती घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.