मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्राचे भूमिपूजन
अलिबाग : जिमाका
महाराष्ट्राला 720 किमीचा सागरी किनारा लाभला असतानाही आपण अन्य राज्यांच्या तुलनेत मत्स्य उत्पादनात मागे आहोत. मत्स्य उत्पादनातून मच्छीमार बांधवांचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. रोजगारनिर्मितीला चालना देणारे क्षेत्र म्हणून शासन मासेमारी क्षेत्राकडे पाहते. त्यादृष्टीने अलिबाग येथील प्रशिक्षण केंद्र हे अधिकाधिक आदर्शवत ठरावे, असे प्रतिपादन राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी शनिवारी (दि. 16) येथे केले. शासनाच्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत अलिबाग येथील नियोजित मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण केंद्राच्या इमारत बांधकामाचे भूमिपूजन मंत्री जानकर यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास स्थानिक लोकप्रतिनिधींसह अधिकारी उपस्थित होते. सुरुवातीला पुलवामामध्ये दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली.