Breaking News

कशेडी घाटात बस कोसळली

मुलाचा मृत्यू; 15 प्रवासी जखमी

पोलादपूर : प्रतिनिधी
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पोलादपूर तालुक्यातील कशेडी घाटात भोगाव खुर्द गावाच्या वळणावर गुरुवारी (दि. 31) पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास एक खासगी आराम बस दरीमध्ये कोसळली. या अपघातात एका लहान मुलाचा मृत्यू, तर बसमधील 28 पैकी 15 प्रवासी जखमी झाले आहेत.
सायन (मुंबई) येथून कणकवलीकडे जाणारी चिंतामणी ट्रॅव्हल्सची खासगी बस (एमएच 48-के 4237) कशेडी घाटातून जात होती. पोलादपूर तालुक्यातील भोगाव खुर्द गावाजवळ चालक प्रणित चंद्रकांत चव्हाण (32, जोगेश्वरी, मुंबई) याला रस्त्याच्या वळणाचा अंदाज न आल्याने बस थेट 50 फूटांहून अधिक खोल दरीत कोसळली.
अपघाताची खबर मिळताच विविध पोलीस पथकांनी महाडमधील रेस्क्यू टीमसह अपघातस्थळी धाव घेतली. वासुदेव तुकाराम शेलार हे अपघातग्रस्त आरामबसमध्ये अडकले होते. त्यांना बसचा पत्रा कापून बाहेर काढण्यात आले. जखमींना तातडीने पोलादपूर ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले.
या अपघाताची नोंद पोलादपूर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, चालक प्रणित चंद्रकांत चव्हाण याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (मृत व अपघातग्रस्तांची नावे पान 2 वर..)
बसमध्ये 28 प्रवासी होते. त्यापैकी गंगाराम गोपाळ पडवळ (वय 60), सुमित्रा गंगाराम पडवळ (60, दोघे रा. पडवळवाडी, ता. संगमेश्वर), चंद्रप्रिया विठ्ठल शिवगण (67, हातीव, ता. संगमेश्वर), राजेंद्र कृष्णा राऊळ (36), श्रीकृष्ण वासुदेव राऊळ (70, दोघे कसगाव तळवडे, ता. कणकवली), वनिता विजय प्रभू (56, रा. तरळे), रिया राजेंद्र करमाळ (29), आशा अशोक लाटेनकर (32, दोघी केळवली, जि. रत्नागिरी), सलोनी सदानंद कावले (14, मुंबई), विठ्ठल शिवराम शिवगण (77), प्रमोद विठ्ठल मोहिते (45), संतोष विठ्ठल मोहिते (48, तिघे गोवंडी), राकेश मनोहर भालेराव (23, आंबडस, खेड) आणि वासुदेव तुकाराम शेलार (70, रा. करमळकरवाडी, ता. कणकवली) असे 15 प्रवासी जखमी झाले, तर साई राजेंद्र राणे (8, नायगाव, मुंबई) हा लहान मुलगा जोरदार मार बसल्याने जागीच गतप्राण झाला.

Check Also

गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, नैना, पायाभूत सुविधासंदर्भात योग्य नियोजन व्हावे

आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, …

Leave a Reply