Breaking News

काँग्रेस-शेकाप उरलेय पाठिंब्यापुरते

रायगड लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार अनंत गीते व राष्ट्रवादी काँगेसचे उमदेवार सुनील तटकरे दोघांपैकी काणे बाजी मारणार. अनंत गीते या मतदारसंघात विजयाची हॅट्ट्रीक कारणार की सुनील तटकरे त्यांचा विजयी रथ रोखणार याची चर्चा सुरू आहे. त्याचबरोबर शेकाप व काँग्रेसचे काय होणार यांचीदेखील चर्चा होत आहे. पूर्वीच्या कुलाबा लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने आठ तर शेकापने सहा खासदार दिले आहेत. या दोन्ही पक्षांची रायगड जिल्ह्यात स्वतःची ताकद होती, परंतु मतदारसंघाच्या पुनर्रचनेत कुलाबा मतदारसंघ गेला. या मतदारसंघातील तीन विधानसभा मतदारसंघ मावळला, तर चार विधानसभा मतदारसंघ रायगड लोकसभा मतदारसंघाला जोडले गेले. त्यामुळे राजकीय समीकरणे बदलली. शेकाप आणि काँग्रेसची ताकद विभागली गेली. त्यामुळे हे दोन्ही पक्ष लोकसभा निवडणुकीत केवळ पाठिंबा देण्यापुरतेच उरले आहेत. ही परिस्थिती या दोन पक्षांवर का आली याचा विचार दोन्ही पक्षांमधील नेत्यांना जरूर करावा लागणार आहे.

1952 साली झालेल्या पहिल्या  लोकसभा निवडणुकीत तेव्हाच्या कुलाबा मतदारसंघातून काँग्रेसचे सी. डी. देशमुख हे पहिले खासदार म्हणून निवडून आले. 1957 साली झालेल्या दुसर्‍या निवडणुकीत शेकापचे भाऊसाहेब राऊत हे निवडून आले. पुढे पाच वर्षांनी 1962ला झालेल्या निवडणुकीत पुन्हा एकदा काँग्रेसचे भास्करराव दिघे विजयी झाले. 1967 साली शेकापचे नानासाहेब कुंटे विजयी झाले. 1971 मध्ये काँग्रेसचे शं. बा. सावंत हे निवडून आले. 1977 साली शेकापचे दि. बा. पाटील हे खासदार झाले. 1980मध्ये काँग्रेसचे ए. टी. पाटील हे खासदार म्हणून निवडून आले. 1984 साली रायगडच्या मतदारांनी शेकापचे दि. बा. पाटील यांना आपला खासदार म्हणून निवडले. 1989 ला झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे ए. आर. अंतुले यांनी खासदार म्हणून दिल्लीत रायगडचे प्रतिनिधित्व केले. त्यानंतर  1991 आणि 1996 अशा सलग तीन निवडणुका जिंकून बॅ. अंतुले यांनी हॅटट्रीक केली.

1998 आणि 1999 या सलग दोन निवडणुका शेकापचे रामशेठ ठाकूर यांनी जिंकल्या. त्यांना हॅटट्रीक करण्याची संधी होती, परंतु त्यांनी लोकसभेची निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे  पुन्हा 2004 साली काँग्रेसचे बॅ. ए. आर. अंतुले जिंकले. शिवसेनेने या मतदारसंघात निवडणुका लढवल्या, परंतु त्यांना विजय मिळवता आला नाही.

2009 साली मतदारसंघांची पुनर्रचना झाली.  त्यात पूर्वीचा कुलाब मतदारसंघ विभागला गेला. कुलाब मतदारसंघातील पेण, अलिबाग, श्रीवर्धन व महाड हे चार मतदारसंघ व रत्नागिरीमधील गुहागर व दोपोली हे दोन विधानसभा मतदारसंघ मिळून रायगड मतदारसंघ तयार झाला. त्यामुळे या मतदारसंघाची राजकीय समीकरणे बदलली. शेकापने उमेदवार उभा केला नाही. त्यांनी शिवसेनेचे अनंत गीते यांना पाठिंबा दिला. शेकाप-सेना युतीच्या जोरावर शिवसेनेचे अनंत गीते हे रायगडमधून निवडून आले.

2014 साली काँग्रेसकडून राष्ट्रवादीने हा मतदारसंघ मागून घेतला. या वेळी शेकापने आपला उमेदवार उभा केला खरा, परंतु तो त्यांच्या पक्षातील नव्हता. राष्ट्रवादीचे सुरेश कदम यांना पक्षात घेऊन त्यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात  आली. त्यामागचे राजकरण वेगळे होते. शकापची मते दुसरीकडे जाऊ नयेत म्हणून शकापने ही खेळी केली होती, परंतु त्यांची ही खेळी यशस्वी झाली नाही. अनंत गीतेच निवडून आले. तिकडे मावळमध्ये देखील राष्ट्रवादीतून आलेले लक्ष्मण जगताप यांना उमेदवारी देण्यात आली. तेथे देखील शिवसेनेचे श्रीरंग बारणे जिंकले. यंदाच्या निवडणुकीत तर शेकापने दोन्ही मतदारसंघात आपले उमेदवार उभेच केले नाहीत. रायगड जिल्ह्यातील काँग्रेसदेखील राष्ट्रवादी काँगे्रसबरोबर फरफटत चालली आहे.

काँग्रेस आणि शेकाप यांची एके काळी या जिल्ह्यात ताकद होती. दोन्ही पक्ष एकमेकांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी होते. आज हे दोन्ही पक्ष लोकसभा निवडणुकीत केवळ पाठिंबा देण्यापुरतेच उरले आहेत. कादचित विधानसभा निवडणुकीची गणितं त्यामागे असू शकतील, परंतु याचा अर्थ असा होत नाही की या पक्षाने केवळ विधानसभाच लढवाव्यात. आपल्या छोट्याशा स्वार्थासाठी एखाद्या पक्षासोबत किती काळ फरफटत जाणार याचा विचार प्रमुख्याने शेकाप व काँग्रेसला करावा लागणार आहे.

खरं तर मागील काही वर्षांपासून  शेकाप आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे या जिल्ह्यातील पारंपरिक प्रतिस्पर्धी आहेत. 2014 साली झालेल्या निवडणुकीत शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी सुनील तटकरे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. तटकरेंच्या भ्रष्टाचाराची श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली होती. त्याच तटकरेंना विजयी करा, असे आता जयंत पाटील सांगत फिरत आहेत. यामुळे शकापचे कार्यकर्ते द्विधा मनस्थितीत आहेत. याचे परिणाम शेकापला लोकसभा निवडणुकीत दिसणार नाहीत, परंतु येत्या सहा महिन्यांनी होणार्‍या विधानसभा निवडणुकीत नक्की दिसतील. आपण केवळ विधानसभा आणि जिल्हा परिषदेचीच निवडणूक लढवायची का. भविष्यात विधानसभा निवडणुकांमध्ये देखील शेकाप केवळ पाठिंबा देण्यापुरताच उरणार नाही याचा विचार शेकापच्या नेत्यांनी करायला हवा.

-प्रकाश सोनवडेकर, खबरबात

Check Also

जाहीर धुव्वा

विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन शुक्रवारी संपले. या संपूर्ण अधिवेशनाच्या काळात विरोधी पक्षाचे नेते पूर्णत: निष्प्रभ झालेले …

Leave a Reply