पोलादपूर ः प्रतिनिधी
नगर पंचायत पोलादपूर आणि पोलादपूर येथील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या व्यवस्थापन व प्रशासनातील सामंजस्याअभावी स्थानकाच्या आवारात निर्माण झालेला सांडपाण्याचा प्रश्न सध्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने धसास लावण्याचा निर्धार केला आहे. त्या अनुषंगाने शहर अध्यक्ष दर्पण दरेकर यांनी सोमवारपासून (दि. 4) एसटी स्थानक परिसरात स्वाक्षरी आंदोलन सुरू केले आहे.
पोलादपूर एसटी स्थानकातील स्वच्छतागृह आणि गटारांची लॉकडाऊन काळात प्रवासी व गाड्या नसताना वेळीच देखभाल केली गेली नाही. त्यामुळे आता महामंडळाची प्रवासी वाहतूक सुरू झाल्यानंतर बसस्थानकामध्ये मोठ्या प्रमाणात दुर्गंधीयुक्त सांडपाणी वाहू लागले आहे. परिणामी प्रवासी व नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. याबाबत पोलादपूर शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष दर्पण दरेकर यांनी स्थानक प्रमुखांना निवेदन देऊन सांडपाणी दूर न झाल्यास लवकरच आंदोलन करण्याचा इशारा दिला. या वेळी मनसेचे वरिष्ठ सल्लागार योगेश सकपाळ, वसीम धामणकर, मनविसेचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष इरफान धामणकर, तालुका अध्यक्ष ओंकार मोहिरे, शहर अध्यक्ष प्रवीण पांडे, शहर उपाध्यक्ष सुमित जिमन, आदेश गायकवाड, निखिल वनारसे, विघ्नेश जाधव आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
पोलादपूर एसटी बस स्थानकातून बाहेर मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर येणार्या सांडपाण्याबाबत यापूर्वी मनसेने बॅनरबाजी करून केलेले आंदोलन यशस्वी ठरल्यानंतर पुन्हा मनसेतर्फे स्वच्छ स्थानक, स्वच्छ स्वच्छतागृहे हा प्रवाशांचा हक्क असल्याची जाणीव निर्माण करण्यासाठी स्वाक्षरी मोहिमेद्वारे अनोखे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
दरम्यान, पोलादपूर नगर पंचायत प्रशासनाने हा प्रश्न महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अखत्यारीतील असल्याचे सांगून दुर्लक्ष केले आहे, तर महामंडळाचे अधिकारी याबाबत मौन सोडत नाही.
या आंदोलनाद्वारे प्रवासी जनतेचा स्वच्छ स्थानक, स्वच्छ स्वच्छतागृह यासाठीचा हक्क आबाधित राहण्यासाठी पाठिंबा गोळा करण्यासाठी ही स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येऊन प्रवासी जनतेच्या पाठिंब्यासह मागणीचे पत्र पालकमंत्री अदिती तटकरे यांच्यासह सर्व संबंधित यंत्रणांना देण्यात येणार असल्याची माहिती मनसे शहर अध्यक्ष दर्पण दरेकर यांनी दिली.
गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेचे आमदार भरत गोगावले आणि राजिपच्या तत्कालीन अध्यक्ष अदिती तटकरे यांनी पोलादपूर एसटी स्थानकातील स्वच्छतागृहांचा प्रश्न मार्गी लावण्यासंदर्भात पाठपुरावा केल्याची चर्चा होती.
लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणूक होऊन राज्यात महाआघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर विद्यमान पालकमंत्री अदिती तटकरे आणि आमदार भरत गोगावले यांनी या प्रश्नाकडे तातडीने लक्ष दिले असते, तर पोलादपूर एसटी स्थानकातील सांडपाण्याचा प्रश्न गंभीर झाला नसता, असे मनसे अध्यक्ष दर्पण दरेकर यांचे म्हणणे आहे.