Breaking News

पोलादपूरचा अपघात चालकाच्या निष्काळजीपणामुळे तिघे ठार, 67 जण जखमी

पोलादपूर ़: प्रतिनिधी

चालकाने भरधाव वेगाने टेम्पो चालविल्यानेच पोलादपूर तालुक्यातील कुडपण खुर्द धनगरवाडी भागात शुक्रवारी (दि. 8) सायंकाळी अपघात झाल्याची माहिती पोलीस तपासात उघडकीस आली आहे. कोंडूशी (जि. सातारा) येथील लग्न समारंभ आटपून खवटी (जि. रत्नागिरी) येथे येताना वर्‍हाडाच्या टेम्पोला कुडपण खुर्द झालेल्या अपघातात तीन व्यक्ती मृत झाल्याने या लग्नकार्यावर शोककळा पसरली आहे.

खवटी धनगरवाडीतून टेम्पो (एमएच08-जी 3027) मधून कोंडूशी गावातील मुलीसोबत लग्न लावण्यासाठी गेलेल्या वर्‍हाडाचा परतीचा प्रवास पोलादपूर तालुक्यात सर्वत्र पावसाच्या सरी कोसळल्याने जीवघेणा ठरला. या टेम्पोचा चालक बंटी उर्फ निलेश दत्ताराम दळवी (27, खवटी, ता. खेड) हा निसरडा रस्ता आणि एका बाजूने दरी असूनही त्याकडे दूर्लक्ष वेगाने टेम्पो चालवीत निघाला होता. शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास कुडपण धनगरवाडीजवळील वळण उतारावर टेम्पोवरील ताबा सुटल्याने रस्त्याच्या संरक्षक कठड्यासह टेम्पो सुमारे 60-65 फूट खोल दरीत कोसळला.

या अपघातात तुकाराम झोरे (40, रा. कुंभार्डे), हरिश्चंद्र भावेश होगडे (22, रा. तुळशी धनगरवाडी) आणि विठोबा भागोशी झोरे (65, रा. खवटी) हे तिघे मृत्यू पावले. तर 67 प्रवाशांना दुखापती झाल्या. जखमीमध्ये महाड व पोलादपूर परिसरातील 27 जणांचा, खेड तालुक्यातील 39 व मंडणगड येथील एकाचा समावेश आहे.  टेम्पोचालक बंटी गंभीररित्या जखमी झाला आहे. 

दरम्यान, कुडपणचे सरपंच रवींद्र चिकणे हे पत्नीसोबत कारमधून प्रवास करीत असताना त्यांना या अपघाताची जाणीव झाली. त्यांनी दरीत कोसळलेल्या टेम्पोमधील वर्‍हाडीमंडळींना बाहेर काढण्यास सुरूवात केली. परिसरातील लोकांनी अपघातस्थळी येऊन मदतकार्य सुरू केले. पोलादपूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत जाधव, महाड उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश तांबे, आमदार गोगावले, खेड येथील वैभव खेडेकर, दर्पण दरेकर आदींसह ग्रामस्थ, कार्यकर्ते, स्वयंसेवी व्यक्ती तसेच रेस्क्यू टीमने जखमींना रूग्णालयामध्ये नेण्याची सोय केली. पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात खासगी डॉक्टरांसह वैद्यकीय अधिक्षिका डॉ. भाग्यरेखा पाटील आणि महाड ट्रॉमा केअर सेंटरचे डॉ. भास्कर जगताप यांनी जखमींवर उपचार केले.  

या अपघाताची नोंद पोलादपूर पोलीस ठाण्यात करण्यात असून, टेम्पोचालक बंटी उर्फ निलेश दत्ताराम दळवी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सुरू आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply