पोलादपूर ः प्रतिनिधी
तालुक्यातील धारवली येथील श्री दत्तात्रेय मंदिरामध्ये भारतीय डाक विभाग डाकघर अधीक्षक अलिबाग, रायगड यांच्यामार्फत सामाजिक बांधिलकी अंतर्गत विविध सेवा प्रदान करण्याचा भाग म्हणून सोमवारी (दि. 4) सकाळी ’आधार केंद्र आपल्या दारी’ उपक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
आधार केंद्र आपल्या दारी उपक्रमांतर्गत सर्व वयोगटासाठी आधार कार्ड, सर्वसामान्य नागरिकांसाठी वैध ओळखपत्र, वैध जन्मतारखेचा पुरावा आणि वैध रहिवासी पुरावा आदींची गरज असून आधार दुरूस्तीसाठी मोबाइल नंबर, वैध जन्मतारखेचा पुरावा आणि वैध रहिवासी पुरावा आदी कागदपत्रे आवश्यक आहेत. येथे मोफत आधार नोंदणी करण्यात येणार असून आधार दुरूस्तीसाठी बायोमेट्रीक पद्धतीने 100 रुपये आणि इतर दुरूस्तीसाठी 50 रुपये आकारणी केली जाणार आहे. या उपक्रमांतर्गत रंगीत आधार कार्डसाठी केवळ 30 रुपये अधिकृत शुल्क घेण्यात येणार आहे. ’आधार केंद्र आपल्या दारी’ उपक्रमाच्या अधिक माहितीसाठी पोलादपूर तालुक्यातील नजीकच्या पोस्ट कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन भारतीय डाक विभाग डाकघर अधीक्षक अलिबाग, रायगड यांच्यामार्फत करण्यात आले आहे.