Breaking News

राहुलजी, अमेठीच्या विकासाचे काय?

भाजप नेत्या स्मृती इराणींचा खडा सवाल

अमेठी ः वृत्तसंस्था : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला, तर दुसरीकडे भाजपाच्या नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी वायनाडच्या लोकांना सावध करत राहुल यांनी अमेठीत विकासकामे केली नसल्याचा आरोप केला आहे. राहुल यांनी 15 वर्षे अमेठीतील लोकांच्या मदतीने सत्तेची मजा लुटली आणि आता ते दुसरीकडून उमेदवारी अर्ज भरत आहेत. हा अमेठीतील लोकांचा अपमान असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

राहुल गांधी यांनी काल सकाळी लोकसभा निवडणुकीसाठी केरळमधील वायनाड मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला. राहुल गांधी यांच्यासोबत त्यांची बहीण आणि काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधीदेखील या वेळी उपस्थित होत्या. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर रोड शोचे आयोजन करण्यात आले होते. राहुल गांधी या वेळी पारंपरिक मतदारसंघ अमेठी आणि वायनाड अशा दोन मतदारसंघांतून निवडणूक लढवणार आहेत. अमेठीत राहुल गांधींचा सामना भाजपाच्या स्मृती इराणी यांच्याशी होणार आहे. राहुल गांधी हे या वेळी आपला परंपरागत मतदारसंघ अमेठीशिवाय वायनाडमधूनही निवडणूक लढणार आहेत. येथे त्यांची लढत तुषार वेल्लापल्ली यांच्याशी होणार आहे. बीडीजेएस हा मतदारसंघ केरळमध्ये एनडीएचा सहकारी पक्ष आहे. ते या वेळी केरळमधील पाच मतदारसंघांत निवडणूक लढत आहेत, तर इराणी यांनी 2014मध्येही राहुल यांच्या विरोधात अमेठीतून निवडणूक लढवली आहे.

अखिल भारतीय काँग्रेस समितीने जेव्हा केरळ प्रदेश काँग्रेस समितीकडे राहुल गांधी यांच्यासाठी केरळमध्ये सर्वांत सुरक्षित मतदारसंघ कोणता, अशी विचारणा केली तेव्हा सर्वांनी एकमताने वायनाडचे नाव सुचवले होते. वायनाड उत्तर केरळमध्ये असून कर्नाटक आणि तामिळनाडू या दोन राज्यांच्या सीमेवर हा मतदारसंघ आहे. 

अमेठीत काहीच विकासकामे झाली नाहीत. वायनाडमधील लोकांनी येथे येऊन पाहिले पाहिजे. वायनाडमधील जनतेने राहुल यांच्यापासून सावध राहिले पाहिजे. लोकांच्या जीवावर ते खासदार झाले आणि आता धोका देऊन ते दुसर्‍या जागेवरून लढत आहेत. ‘रिजन’ आणि ‘सीझन’ पाहून जानवे धारण करणार्‍या राहुल गांधी देशाचे तुकडे करणार्‍या टोळीबरोबर आपला विजय निश्चित करू इच्छितात, असा टोलाही त्यांनी राहुल गांधी यांना लगावला.

गेल्या 15 वर्षांपासून राहुल गांधी यांनी अमेठीतील लोकांच्या मदतीने सत्ता भोगली आणि आता ते दुसर्‍या ठिकाणाहून उमेदवारी अर्ज दाखल करीत आहेत. हा अमेठीतील लोकांचा अपमान असून येथील लोक ते सहन करणार नाही.

-स्मृती इराणी, केंद्रीय मंत्री

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply