Breaking News

कळवळ्याचा काँग्रेसी कावा

काँग्रेसचे खासदार आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी चक्क ट्रॅक्टर चालवत संसद भवनाकडे कूच केले. मोदी सरकारने आणलेल्या कृषी सुधारणा कायद्यांच्या विरोधात त्यांनी अभिनव आंदोलन छेडले असा त्यांचा दावा आहे. ट्रॅक्टरवरून संसदेत येण्यामध्ये अभिनव असे काय आहे हे काँग्रेसजनच जाणोत. शेतकर्‍यांबद्दल प्रामाणिक कळवळा असता, तर गांधी यांनी सध्या सुरू असलेल्या संसद अधिवेशनात शेतकर्‍यांवर होणार्‍या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला असता, परंतु ते राहिले बाजूलाच.

भारताला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उत्तम नेतृत्व लाभले असले, तरी चांगला विरोधी पक्षनेता मात्र लाभला नाही, असे खेदाने म्हणावे लागते. सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष या दोन चाकांवर संसदीय लोकशाहीचा रथ दौडत असतो. 137 कोटी लोकसंख्येच्या विशाल भारतातील समस्यांचे निराकरण चर्चेद्वारे लोकशाही मार्गाने करण्यासाठीच संसदेचे प्रयोजन आहे. लोकांच्या समस्याच नव्हे तर देशाच्या भविष्यकाळाला आकार देण्याचे कामही हे सर्वोच्च सभागृह करते. निदान तसे लोकशाहीला अभिप्रेत आहे, परंतु उत्कृष्ट नेतृत्वाबरोबरच प्रबळ विरोधी पक्षनेता भारतीय जनतेला मिळाला असता, तर अधिक बरे झाले असते. चांगला विरोधी पक्षनेता खमकेपणाने प्रश्न विचारून सत्ताधारी पक्षाला भंडावून सोडण्याचे काम करतो. त्यायोगे सत्ताधार्‍यांवर अंकुश ठेवणे साध्य होते. अर्थात केवळ विरोधासाठी विरोध करत राहणे हे विरोधी पक्षनेत्याकडून अपेक्षित नाही. स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांनी उत्कृष्ट विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी संसदेमध्ये प्रदीर्घ काळ पार पाडली, त्याची उदाहरणे लोक आजही देतात. आदरणीय वाजपेयीजींची भाषणे ऐकण्यासाठी सत्ताधारी बाकांवरील बडे-बडे नेते आवर्जून उपस्थित राहत. पंतप्रधान मोदी यांनी देशाची सूत्रे स्वीकारल्यानंतर सत्ताधारी पक्षातील पांगुळलेपण नष्ट झाले, परंतु विरोधी पक्ष मात्र दुर्बळ होत गेला. संसदेतील आपली दुर्बलता झाकण्यासाठी काही विरोधी पक्षांना रस्त्यावर उतरून माध्यमांच्या कॅमेर्‍यांसमोर नौटंकी करण्यात धन्यता वाटते. हे निश्चितच जबाबदार विरोधी पक्षनेत्याचे लक्षण नव्हे. राजधानी दिल्लीमध्ये सुरक्षा व्यवस्था कडक असते. किसान आंदोलनाच्या दरम्यान लाल किल्ल्यानजीक जो हिंसाचार झाला होता, त्यानंतर दिल्लीतील सुरक्षा व्यवस्था अधिकच कडक करण्यात आली. राजधानीच्या संसद परिसरामध्ये ट्रॅक्टर आणण्याची परवानगीच नाही. असे असूनही राहुल गांधी यांनी वाहतूक विषयक कायदा धाब्यावर बसवत मोतीलाल नेहरू मार्गावरून संसदेकडे ट्रॅक्टर चालवत नेला. या ट्रॅक्टरला नंबर प्लेट नव्हती, तसेच त्यांच्या आंदोलनासाठी पोलिसांची परवानगीच काँग्रेसने घेतलेली नव्हती, असेही नंतर निदर्शनास आले. दिल्लीच्या वाहतूक विभागाचे सर्व नियम मोडीत काढत राहुल गांधी यांनी ट्रॅक्टर चालवून सरकारचे डोळे उघडण्याचा प्रयत्न केला, परंतु तो त्यांच्याच अंगलट आला. नंबर प्लेटच नसलेला हा बेकायदा ट्रॅक्टर दिल्ली वाहतूक पोलिसांनी जप्त केला आहे. त्याचबरोबर रणदीप सुरजेवाला यांच्यासारखे राहुल गांधी यांचे साथीदार पोलिसांनी अटक करून नेले. संसदेचे अधिवेशन गोंधळ घालून बंद पाडायचे आणि रस्त्यावर उतरून आंदोलनाचे नाटक करत सवंग प्रसिद्धी मिळवायची हा गांधी यांच्या काँग्रेसचा सध्याचा खाक्या आहे. काँग्रेसच्या खासदारांनी संसदेमध्ये उत्कृष्ट भाषणे करून छाप पाडल्याचे एकही उदाहरण नाही. किंबहुना, या पक्षाचा संसदीय लोकशाहीवर बहुदा विश्वासच राहिलेला नाही. मोदी विरोधामुळे बेभान झालेल्या काँग्रेसचा हा खोटा कळवळा जनता पूर्णपणे ओळखून आहे.

Check Also

जाहीर धुव्वा

विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन शुक्रवारी संपले. या संपूर्ण अधिवेशनाच्या काळात विरोधी पक्षाचे नेते पूर्णत: निष्प्रभ झालेले …

Leave a Reply