मोहोपाडा ः प्रतिनिधी
महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालय अंतर्गत प्रगती लोकसंचलित साधन केंद्र कर्जत संचालित ग्रामसंस्था महिला बचत गट खालापूर यांच्या वतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त तालुक्यातील आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, पत्रकार, पोलीस, नगर पंचायत मुख्याधिकारी, नायब तहसीलदार तसेच आपत्कालीन सेवा देणार्या योद्ध्यांना कोरोना योद्धा सन्मानाने गौरविण्यात आले.
ग्रामसंस्था महिला बचत गटांकडून क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त खालापूर येथील हनुमान मंदिराच्या सभामंडपात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी खालापूर नगर पंचायतीच्या मुख्याधिकारी सुरेखा भनगे, निवासी नायब तहसीलदार कल्याणी कदम, पीएसआय अंधारे, जिल्हा समन्वय अधिकारी वर्षा पाटील यांच्या हस्ते सावित्रीबाईंच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यानंतर उपस्थित मान्यवरांचे आभार मानून ग्रामसंस्था महिला बचत गटांच्या अध्यक्ष हेमलता चिंबुलकर यांनी बचत गटांची प्रस्तावना मांडली.
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व जिजाऊ माता यांच्या कारकिर्दीची माहिती सावित्रीबाईंचा व जिजाऊंचा वेश परिधान केलेल्या महिलांनी दिली. कोरोनाच्या संकटकाळात कर्तव्यनिष्ठ राहून जीवाची पर्वा न करता समाजकार्य करणार्या तालुक्यातील आशा वर्कर, अंगणवाडी सेविका यांचा सन्मान करण्यात आला, तर आपत्कालीन सेवेबद्दल भक्ती साठेलकर, पत्रकारिता क्षेत्रात मीडिया सन्मान पत्रकार राकेश खराडे व मेहबूब जमादार यांना कोरोना योद्धा सन्मानाने सन्मानित करण्यात आले. पत्रकार प्रशांत गोपाले व समाधान दिसले यांना युवा पत्रकार कोरोना योद्धाने सन्मानित करण्यात आले. पत्रकार मनोज कलमकर व अमोल पाटील यांनाही कोरोना योद्धाने सन्मानित करण्यात आले.
खालापूर पोलीस ठाणे पीएसआय अंधारे मॅडम यांच्या कर्तव्यदक्षतेबद्दल त्यांना कोरोना योद्धा गौरवाने सन्मानित करण्यात आले. नगर पंचायत मुख्याधिकारी सुरेखा भनगे, निवासी नायब तहसीलदार कल्याणी कदम यांनी कोरोनाकाळात दिलेल्या सेवेबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले. जिल्हा समन्वय अधिकारी वर्षा पाटील, ग्रामसंस्था महिला बचत गटांच्या अध्यक्ष हेमलता चिंबुलकर, उपाध्यक्ष विजया पाटील, सचिव सविता कदम, प्रगती लोकसंचलित साधन केंद्र कर्जत अध्यक्ष व सदस्य, छाननी कमिटी मेंबर्ससह ग्रामसंस्था पदाधिकारी व सदस्य या वेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन योजन पाटील यांनी केले.