Breaking News

रस्ता बनवा आणि फोडा हाच सिडकोचा धंदा

घरातील लहान मुलं एखादे खेळणे जोडल्यावर  टाळ्या वाजवते आणि मग लगेच ते तोडून टाकते, त्यावेळी त्यांचे सगळे कौतुक करतात. अशीच कौतुकाची थाप पाठीवर पडण्यासाठी ‘बालबुध्दी‘ असलेले सिडकोचे अधिकारी सध्या नवीन पनवेलमधील रस्ते बनवणे आणि ते लगेच फोडण्याचा खेळ करीत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे रस्ता बनवा आणि फोडा हाच सिडकोचा धंदा  झाला आहे. या खेळामुळे गरीब करदाते नागरिक मात्र हैराण झाले असून या सिडको अधिकार्‍यांचे कौतुक करण्याऐवजी त्यांना शिव्या-शाप देताना दिसत आहेत. महाराष्ट्र शासनाने मुंबईची गर्दी कमी करण्यासाठी सिडकोची स्थापना करून नवी मुंबई वसविली. त्यात पनवेल पूर्वेला नवीन पनवेल वसाहत निर्माण केली. त्यावेळच्या सिडकोच्या अधिकार्‍यांनी भविष्यात होणार्‍या पनवेल आणि आजूबाजूच्या परिसराच्या विकासाचा वेध व्यवस्थित घेतला नाही. नवीन पनवेल बाजूला त्यावेळी जागा स्वस्त असल्याने अनेकांनी तेथे जागा घेतल्या. रेल्वे स्टेशनमधून बाहेर पडल्यावर उजव्या बाजूला विचुंबे आणि उसर्लीकडे रस्ता जातो, डावीकडे एचडीएफसी सर्कल मार्गे खांदा कॉलनी, डी-मार्ट, नेरे आणि आदईकडे तर बिकानेर कॉर्नरवरुन सरळ सुकापूर, नेरे येथे रस्ता जातो. या भागात मोठ्या प्रमाणात वसाहती झाल्याने नागरिकरण वाढले आहे. रेल्वे स्टेशन जवळील रस्त्यावर वाहतूक वाढणार याचा अंदाज सिडकोला आला नाही. त्यामुळे रस्त्याची रुंदी कमी ठेवली आज तेथून नागरिकांना चालणेही अवघड झाले आहे. या रस्त्यावर सतत गर्दी असते. त्यातच गेली 15 वर्षे खड्डे असलेल्या या रस्त्यांमुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होताना दिसते. पनवेलचे नगरसेवक तेजस कांडपिळे आणि अ‍ॅड. मनोज भुजबळ यांनी हे अरुंद रस्ते कमीतकमी चांगले तरी करावेत, त्यावरील खड्डे भरावेत, अशी मागणी केल्यानंतर तत्कालीन सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी नवीन पनवेलमधील सेक्टर 1 ते 11 (पूर्व) मध्ये रस्ते दुरुस्तीसाठी नऊ कोटी 25 लाख 34 हजार रुपये,  नवीन पनवेलमधील सेक्टर 1 ते 18 (पश्चिम) मध्ये पदपथ दुरुस्तीसाठी सहा कोटी 54 लाख 99 हजार रुपये, सेक्टर 2 ते 6, सेक्टर 11 व 12  आणि  सेक्टर 14 ते 17 (पूर्व) मधील रस्ते दुरुस्तीकरिता नऊ कोटी 95 लाख 42 हजार रुपये, सेक्टर 12 ते 19 (पूर्व) मधील गटारे व पदपथ कामासाठी आठ कोटी 57 लाख 99 हजार रुपये मंजूर केले होते. परंतु कोव्हीडमुळे ही कामे झाली नाहीत. नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस रस्त्याची कामे करण्यात आली. छान रस्ते झाल्याने येथील नागरिकही खुश झाले. पण हे समाधान फार काळा टिकले नाही. वर्षाखेरीस सिडकोने पाइपलाइन, फुटपाथ आणि गटारांची कामे सुरू केली. त्यासाठी रस्ता खणण्याचा उद्योग केला. त्यामुळे चांगल्या रस्त्यावरून चालण्याचे भाग्य येथील नागरिकांना महिनाभरही मिळाले नाही. खराब रस्त्यावरून वाहने चालवून दुखणी मागे लागल्याने डॉक्टरांची आणि मॅकेनिकलची बिले भरून हैराण झालेल्या नागरिकांना हा एक धक्काच बसला आहे. चेंबुर बँकेजवळच्या चौकात संध्याकाळच्या वेळेत म्हणजे कार्यालय बंद झाल्यानंतर (या कामावर देखरेख करायला कोणी अधिकारी येण्याची शक्यता नसताना) जेसीबी लावून तेथील रस्ता खणण्यात आला, या मागचे गौडबंगाल काय? या ठिकाणी पाण्याची मोठी पाइपलाइन टाकण्यात आली. ती बुजवल्यावर पुन्हा महावितरणाची लाइन टाकण्यासाठी रस्ता खणण्यात आला. या रस्त्यावर पाडलेले खड्डे दोन विभागामार्फत भरण्यात येतील. पाणीपुरवठा विभाग डब्ल्यूपीएम करणार तर  बांधकाम  विभाग सरफेसचे काम करील असे सिडकोचे अधिकारी गौरव हिंगणे यांनी नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ यांना सांगितले. मायबाप एकच असताना सिडकोच्या वेगवेगळ्या विभागाचा एकमेकांशी समन्वय का नाही? रस्ता बनवण्यापूर्वी पाइपलाइनचे काम करता येणे शक्य  असताना रस्ता तयार होण्याची वाट का पहिली, असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे. या ठेकेदाराकडून किती अनामत रक्कम घेण्यात आली आहे. आता फोडलेला हा रस्ता किती दिवसात पुन्हा पूर्ववत करण्यात येईल त्याचा खुलासा सिडकोचे अधिकारी करतील का? नाहीतर खड्डे भरण्याच्या कामात जास्त कमिशन मिळते हेच खरे असे म्हणावे लागेल आणि असे असेल तर सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांनी नागरिकांचा पैसा फुकट घालवणार्‍या या अधिकार्‍यांच्या पगारातून हा पैसा वसूल करावा अन्यथा नगरसेवक मनोज भुजबळ म्हणतात त्याप्रमाणे उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याला पर्याय राहणार नाही.

नवीन पनवेलमध्ये चांगला रस्ता व्हावा यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्यामार्फत  मी व सहकारी प्रयत्न करीत होतो. रस्ता झाल्यामुळे बरे वाटले, मात्र तोच पुन्हा खणण्यात आला. रस्ता झाल्यावर 15 दिवसांत तो खणण्याऐवजी आधी पाइपलाइन टाकून घेणे शक्य होते. नागरिकांचा पैसा फुकट घालवणार्‍या अधिकार्‍यांच्या पगारातून तो वसूल करावा यासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार आहे.

-अ‍ॅड. मनोज भुजबळ, नगरसेवक, पनवेल मनपा

आम्ही रस्ता केल्यानंतर पाणीपुरवठा विभागाला या भागात नवीन पाइपलाइन टाकणे अत्यावश्यक असल्याचे वाटल्याने त्यांनी रस्ता फोडण्याची परवानगी मागितली. पाण्याचा प्रश्न असल्याने आम्ही परवानगी दिली. हा रस्ता आम्ही पुन्हा व्यवस्थित करून घेऊ.

-मेहबूब मुलाणी, कार्यकारी अभियंता, सिडको महामंडळ

रस्ता केल्याने वाहने चालवताना खड्ड्यांचा त्रास होत नव्हता. त्यामुळे समाधान वाटले होते, पण लगेच पुन्हा रस्ता खणल्याने आमचा भ्रमनिरास झाला. रस्ता करण्यापूर्वी लाइन टाकता आली असती. सिडकोच्या अधिकार्‍यांनी जनतेच्या जीवाशी खेळणे आता थांबवावे.

-पुष्पा गरड, स्थानिक रहिवाशी, नवीन पनवेल -नितीन देशमुख 

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply